पुणे : दिवाळी सुरू झाली तरीही फटाक्यांच्या स्टॉलचा वाद अजूनही सुरूच आहे. म्हात्रे पुलाजवळच्या नागरिकांनी विरोध केल्यानंतर आता बहुतेक विक्रेते विखुरले गेले असून शनिवार पेठेतील वर्तक बाग, वडगाव शेरी येथे एका खासगी जागेत, हडपसर, पांडवनगर यांसह उपनगरांतील रस्त्यांवर, गल्लीबोळातही फटाका स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. तिथे सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिका, अग्निशमन, वाहतूक तसेच पोलीस दल या खात्यांमध्ये कसलाच समन्वय नसल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. फटाक्यांचे स्टॉल धोकादायक असल्यामुळे ते असे एकाच ठिकाणी सुरू करण्याआधी अग्निशमन दलाचे वाहन, वाळू भरलेल्या बादल्या, पाणी अशी सुरक्षेची सर्व व्यवस्था करावी लागले. अशी व्यवस्था केल्याशिवाय या विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. वाहतूक शाखेकडून वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे प्रमाणपत्र घ्यावे लागते. ते असल्याशिवाय अग्निशमन दल त्यांचे प्रमाणपत्र देत नाही. हे प्रमाणपत्र असतील तरच महापालिकेकडून त्यांची जागा लिलाव पद्धतीने दिली जाते. यापैकी काहीही नसेल तर संबंधित स्टॉल अनधिकृत असल्याचे सांगून पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तो स्टॉल काढला जातो.ज्यांना लिलावात जागा घेणे शक्य नव्हते, अशा अनेकांनी रस्त्यांवरील गल्लीबोळातच दुकान अनधिकृतपणे सुरू केले आहे. त्याच्याच शेजारी गोडाऊनही केले आहे. तिथे तसेच वर्तक बाग, मुळिक गार्डन, भोसले गार्डन अशा परवानगी दिलल्या १५ पैकी एकाही ठिकाणी, किंवा रस्त्यांवरच्या स्टॉलजवळही अग्निशमन करण्याची कसलीही व्यवस्था आजमितीस नाही. वाहन तर नाहीच, शिवाय वाळूने भरलेल्या बादल्या, पाणी असे काहीही नाही. शहराची सुरक्षितताच त्यामुळे धोक्यात आली आहे. याची माहिती असूनही कोणी कारवाई करायला तयार नाही. एकमेकांवर जबाबदारी ढकलून या धोकादायक स्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. (प्रतिनिधी) वर्तक बागेजवळच्या स्टॉलबाबत माजी नगरसेवक उदय जोशी यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. शनिवार पेठ रहिवासी विभाग असल्यामुळे दुर्दैवाने काही दुर्घटना घडलीच तर मोठी जीवितहानी होईल, अशी भीती व्यक्त करून त्यांनी परवानगी रद्द करावी, अशी मागणी केली आहे.इतक्या सगळ्या नियमांमधूनही फटाके विक्रेत्यांनी पळवाट काढत ठिकठिकाणी स्टॉल उभे केले आहेत. सारसबागेजवळच्या सणस मैदानातील त्यांची बाजारपेठ बंद झाल्यापासून हे सगळे विक्रेते विस्थापितच झाले आहेत. म्हात्रे पुलाजवळ त्यांचे बस्तान बसत होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर आता तीही बाजारपेठ बंद झाली आहे. शहरातील एकूण १५ ठिकाणी महापालिकेने जागांचा लिलाव करून फटाके स्टॉलना परवानगी दिली आहे. ती देताना त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याशिवाय काहीही करण्यात आलेले नाही. प्रत्यक्षात त्यांनी सुरक्षेची काही व्यवस्था केली आहे किंवा नाही ते तपासण्याची कसलीही यंत्रणा पालिका, पोलीस, वाहतूक व अग्निशमन यांच्याकडे नाही. परवाना देताना संबंधितांकडून आवश्यक ती सुरक्षा घेतली जाईल, असे हमीपत्र घेण्यात येते. १५ ठिकाणी परवानगी दिली आहे, मात्र त्यांच्यापैकी कोणाहीकडून अद्याप एकाही वाहनाची मागणी आलेली नाही. संबंधित स्टॉलधारक किंवा त्यांनी एकत्रितपणे येऊन वाहनाची मागणी करावी, एका दिवसासाठी २४ हजार रुपयांप्रमाणे आकारणी करून आम्ही त्यांना वाहन उपलब्ध करून देत असतो. मात्र अशी मागणी अद्यापपर्यंत कोणीही केलेली नाही.प्रशांत रणपिसे, अग्निशमन दल विभागप्रमुखमहापालिकेने ज्यांच्याकडे ना-हरकत प्रमाणपत्र आहेत अशांना जागा दिल्या आहेत. सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची असते. अग्निशमन दलाची सेवा त्यासाठीचे शुल्क जमा करून त्यांनीच करून घ्यायची असते. रस्त्यावरच्या एकाही स्टॉलला पालिकेने परवानगी दिलेली नाही. पोलिसांकडे तक्रार केली गेली तर अशा स्टॉलधारकांवर त्वरित कारवाई होऊ शकते.- सतीश कुलकर्णी, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन, महापालिका
फटाका स्टॉलसाठी नाही सुरक्षेची व्यवस्था
By admin | Updated: October 30, 2016 02:55 IST