लष्कर : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपध्यक्ष नगरसेवक अतुल गायकवाड यांनी शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांच्या हस्ते महर्षी अण्णासाहेब शिंदे शाळा येथे झाले.
महर्षी अण्णासाहेब प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यम शाळा व झेप शाळा यातील जवळपास ४० शिक्षकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. याप्रसंगी डिव्हाइन कॅम्पस संस्थेचे संचालक भूषण अंबाडकर, मुख्याध्यापिका अर्चना कारेकर उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या शाळेतील शिक्षकांचे बौद्धिक वाढावे, शिक्षणातील आधुनिक गोष्टी अवगत व्हाव्यात या दृष्टीने नगरसेवक गायकवाड यांनी २०१८ साली पुढाकार घेत सर्व शिक्षकांची उद्बोधन कार्यशाळा महादजी शिंदे शाळा, वानवडी या ठिकाणी आयोजित केली होती.
या वेळी अमित कुमार म्हणाले, की खरंच अशा कार्यशाळेची नितांत गरज आहे. येत्या १५ दिवसांत बोर्डाच्या संपूर्ण शाळेतील शिक्षकांसाठी उद्बोधन कार्यशाळा घेण्याचे त्यांनी जाहीर केले.
स्वाती ताडफळे (सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक, निर्मिती संशोधन मंडळ) व शुभांगी केळकर (प्रायोगिक अध्यापिका व शैक्षणिक सल्लागार) यांनी मार्गदर्शन केले.
झेप या विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी स्वतः बनवलेली सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांचा सत्कार केला. मनीष खंडागळे यांनी सूत्रसंचालन, तर मुख्याध्यापिका अर्चना कारेकर यांनी आभार मानले.