लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “गोरा रंग, सडपातळ बांधा, आखीव-रेखीव शरीरयष्टी म्हणजेच ‘सुंदरता’. हेच लहानपणापासून मनावर बिंबवण्यात येते. आपण त्याच नजरेतून पाहातो. का, लठ्ठ मुली सुंदर नसतात का?” असा प्रश्न करत अभिनेत्री वनिता खरातने न्यूड फोटोग्राफी (नग्न छायाचित्रण) करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
“लठ्ठ मुलींच्या आयुष्यात कधी कुणावर प्रेम जडत नाही का? त्यांच्यावर कुणी प्रेम करीत नाही का? परीकथेमधली ’परी’ पण छान बाहुलीसारखीच का? दिसायला हवी,” असे प्रश्न वनिताने उपस्थित केले. सुंदरतेबद्दलतेचा जो ‘टँबू’ तयार झाला आहे. तोच कुठंतरी ‘ब्रेक’ झाला पाहिजे, यासाठी ‘फोटो शूट’ केलं, असं ती म्हणाली. सध्या सोशल मीडियावर वनिता खरातच्या ‘न्यूड फोटो शूट’चीच चर्चा आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी ‘बॉडी पॉझिटिव्हिटी मुव्हमेंट’ अंतर्गत वनिताचे फोटो फेसबुकवर टाकल्यानंतर नेटकऱ्यांनी वनिताच्या धाडसाचे कौतुक केले आहे. या ‘बोल्ड फोटो शूट’बद्दल ‘लोकमत’ ने वनिताशी संवाद साधला.
वनिता म्हणाली की, मला माझ्या शरीराबद्दल कधीच लाज वाटली नाही.पण लठ्ठ असल्याने आमच्यासारख्या अभिनेत्रींना कायमच साचेबद्ध भूमिका दिल्या जातात. याचं वाईट वाटतं. मी ’कबीर सिंग’ची भूमिका केल्यानंतर मोलकरणीच्याच भूमिका माझ्याकडे येऊ लागल्या. का, आम्ही दुसऱ्या भूमिका करू शकत नाही? आम्ही फक्त आयुष्यभर आजी, आई, मामी, काकू अशाच भूमिका करीत राहायंच असा सवाल वनिताने उपस्थित केला.
“लठ्ठ मुलींना कायमच एक न्यूनगंड असतो. आपल्यावर कुणी प्रेमच करणार नाही. किंवा मी मग बारीक दिसण्यासाठी सैलच कपडे घालायला हवेत. आधी स्वत:वर प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वत:च्या सौंदर्याकडे निखळपणे बघण्याची मानसिकता तयार होणं गरजेचं आहे,” असा सल्ला वनिता खरातने दिला.
चौकट
“विनोद हे कायमच लठ्ठपणावर बांधलेले असतात. आमच्यावर देखील विनोद होतात. आम्ही ते स्वीकारले आहेत. कार्यक्रमात जर परिस्थितीनुसार लठ्ठपणावर भाष्य करता आले तर ते मला आवडते. उलट तेव्हा मला वाईट वाटत नाही तर शब्दांची गमंत वाटते. त्यामुळे शरीराबद्द न्यूनगंड न ठेवता आम्ही दिलखुलासपणे काम करतो. खरंतर हळूहळू समाजाचा लठ्ठ व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय. आमच्याकडे पाहून इतर महिलांच्या मनातील लठ्ठपणाबाबतचा न्यूनगंड दूर होत आहे, हे सकारात्मक आहे”
- विशाखा सुभेदार, प्रसिद्ध अभिनेत्री
चौकट
“लहानपणापासून असे संस्कार केले जातात की बायको ही गोरी, सडपातळ हवी. या प्रमाणबद्ध सौंदर्याची व्याख्या केली तर केवळ २ टक्केच सुंदर असू शकतील. उर्वरित ९८ टक्के महिला न्यूनगंड घेऊन जगतील. खरं तर सुंदरता आणि बेढबता ही व्यक्तीच्या नजरेत असते. याबाबत अभिव्यक्त होणं गरजेचे वाटलं.”
- अभिजित पानसे, दिग्दर्शक
----------------------------------------------