पुणे : सराफी व्यवसायात असलेल्या मुंबईतील तरुणाचा ठिकठिकाणी सुऱ्याने वार करून खून करण्यात आला असून, ५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्यात आली आहे. हा खुनाचा प्रकार रास्ता पेठेतील एका लॉजमध्ये उघडकीस आला. खून केल्याच्या संशयावरून दोघांवर समर्थ ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा नोंदविला.किरण बाबुलाल कोठारी (वय ३० वांका मोहल्ला, पोलभाट लाईन, चिराबाजार, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव असून, समरजितसिंंग आणि सुंदरसिंंग अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी लॉजच्या रजिस्टरमध्ये अमृतसर येथील पत्ता नोंदविला आहे.कोठारी सोन्याच्या नथनींची आॅर्डर एका सराफाला देण्यासाठी आले होते. ते दागिने विक्रीच्या मोहिमा राबवीत असत. रास्ता पेठेतील एका लॉजमध्ये ३०७ क्रमांकाच्या रूममध्ये सोमवारी सायंकाळी साडेसहापासून ते उतरले होते. त्यांच्याच रूममध्ये रविवारी सकाळी साडेसातपासून आरोपीसुद्धा वास्तव्यास होते. लॉजच्या कर्मचाऱ्यांना रूमला बाहेरून कुलूप दिसले. कोठारी यांचा भाऊ वडगावशेरी भागात राहतो. त्याने किरण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे तो लॉजवर गेला. त्या रात्री ते बेपत्ता असल्याचे दिसून आल्यानंतर पहाटे सव्वातीनच्या सुमारास पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली. बुधवारी लॉज व्यवस्थापकाने रूमचे कुलूप कापले, त्या वेळी किरण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. ए. पाटील यांनी सांगितले, की आरोपी खून करून बाहेरील कुलूप लावून गेले होते. त्यांनी ५ लाख रुपयांचे दागिने, नकली नथनी आणि ५ हजार रुपयांची रोकड लांबविली आहे.
रास्ता पेठेतील लॉजमध्ये मुंबईच्या तरुणाचा खून
By admin | Updated: January 23, 2015 00:17 IST