वानवडी पोलिसांची कारवाई : कचरा टाकून सरकारी कामात अडथळा
पुणे : रामटेकडी येथील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात घुसून ओला-सुका कचरा फाईल व टेबलांवर टाकून शासकीय कामात अडथळा आणणारे मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता वानवडी पोलिसांनी बाबर व इतरांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली.
वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयातील सहायक कार्यालयात कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणारे मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडी क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी २२ मार्चला दुपारी घडला होता. सहायक आयुक्त शिंदे या दिल्लीतील पथकासोबत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रभागांतील स्वच्छ सर्वेक्षण योजनेची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. साईनाथ बाबर, इंगळे व त्यांचे १० ते १५ कार्यकर्ते महापालिकेने घातलेले निर्बंध न पाळता कार्यालयात शिरले. त्यावेळी उपअभियंता बागडे व प्रभारी अधीक्षक पांडुरंग लोहकरे यांनी त्यांच्याकडे काय काम आहे अशी विचारणा केली. तरीही ते जबरदस्तीने शिंदे यांच्या केबिनमध्ये घुसले. कार्यालयात ओला, सुका व कुजलेला कचरा टाकला. तसेच, कार्यालयातील लॉबीमध्येही कचरा टाकला. तसेच, कार्यालयातील इतर सहकाऱ्यांच्या टेबलवर व कार्यालयातील कागदपत्रे व फाईलींवर कचरा टाकून काम करण्यास अडथळा आणला.
याप्रकरणी साईनाथ बाबर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर आता वानवडी पोलिसांनी रविवारी रात्री नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक केली़ पोलिसांनी बाबर यांना सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोमलसिंग राजपूत यांच्यासमोर हजर केले. त्यांनी १५ हजार रुपयांच्या जामिनावर बाबर इतर कार्यकर्त्यांची सुटका केली. सर्वांच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. रुपाली पाटील यांनी काम पाहिले.