बारामती : खरे तर बारामतीत आल्यानंतरच माझा योगासने आणि प्राणायाम यांच्याशी परिचय झाला. मी इथे आल्यापासूनच मला त्याच्या विषयी आवड निर्माण झाली. त्यातून योग विद्येचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर योगशिक्षण प्रसाराचे काम हाती घेतले. जवळपास १२ वर्षं मी योगाचे वर्ग घेतले. विद्या प्रतिष्ठान बाल विकास मंदिर येथे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना योगा शिकवला. मात्र, हे काम आता माझी मुलगी डॉ. मृणाल आशय जमदाडे पुढे चालवित आहे. मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. योग अभ्यासामुळे अनेकांचे जीवन बदलून गेले आहे, अशा आपल्या भावना बारामतीतील ज्येष्ठ योगाशिक्षिका कमल ननवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. मृणालच्या लहानपणची आठवण सांगताना त्या म्हणतात, मी बालविकास मंदिर शाळेत योगा वर्गासाठी जात असताना मृणालही माझ्यासोबत येत असे. तेव्हापासून तिला योगाविषयी आवड निर्माण झाली. तेव्हापासून तिला या क्षेत्रात रस निर्माण झाला. मी स्वत: निसर्गोपचार तज्ज्ञ असल्याने तिला आयुर्वेदाचे शिक्षण घेण्याचे सुचविले. आता ती आयुर्वेदाचा पदव्युतर अभ्यास करत आहे. फलटण (ता.सातारा) येथेही तिने महिला व लहान मुलांसाठी योगा वर्ग सुरू केले आहेत. तिच्या आयुर्वेद उपचारांना योगासनांची साथ लाभल्यामुळे अनेक महिलांना त्यांच्या आजारापासून सुटका मिळाली आहे. माझे योगाभ्यासाचे हे व्रत माझी मृणाल पुढे नेत आहे, याचेच मोठे समाधान वाटत आहे.
चालविला योगशिक्षण प्रसाराचा मातेचा वारसा
By admin | Updated: March 7, 2015 23:09 IST