मंगेश पांडे, पिंपरी ‘नो पार्किंग’मध्ये दुचाकी लावली, तर ती उचलून नेण्याची भीती असते, पण तिथेच चारचाकी लावा आणि बिनधास्त फिरा, असा फंडा शहर परिसरामध्ये रुजत आहे. वाहतूक विभाग चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी तत्पर नसल्याचे दिसून येते. वाहनांवरील कारवाईत चारचाकीपेक्षा दुचाकीवर अधिक प्रमाणात कारवाई केली जाते. ‘नो पार्किंग’मधील दुचाकी भराभर टेम्पोत भरल्या जातात. मात्र, ‘जॅमर’ असूनही मोटारींवर हवी तितकी कारवाई केली जात नसल्याचे पाहणीत दिसून आले.दुचाकींप्रमाणेच चारचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या-मोठ्या कामांसाठीही अनेकांकडून चारचाकींचा वापर केला जात आहे. यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांसह काही ठिकाणी ‘नो पार्किंग’ झोन निश्चित केलेले आहेत. या झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे वाहन असल्यास त्यावर कारवाईची तरतूद आहे. कारवाई करण्यासाठी पोलिसांना यंत्रणाही उपलब्ध करून दिली आहे. दुचाकींवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागांना टेम्पो दिले आहेत. कारवाईसाठी पोलीस कर्मचारी आणि दुचाकी उचलण्यासाठी मुले नेमलेली आहेत. त्यामुळे नो पार्किंगमधील दुचाकी सहजरीत्या टेम्पोत भरल्या जातात. दंड भरून दुचाकी मिळविण्यासाठी संबंधित चालकाला वाहतूक विभागाच्या कार्यालयात यावे लागते. तर मोठ्या वाहनांवर जॅमर लावून कारवाई केली जाते. जॅमर लावताना बहुधा चालक त्या ठिकाणी हजर नसतात. दरम्यान, वाहतूक पोलीस जॅमर लावून निघून जातात. त्यानंतर वाहन सोडविण्यासाठी चालकाने वाहतूक विभागाच्या कार्यालयात जाऊन दंड भरल्यास जॅमर खोलण्यासाठी पुन्हा वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याला यावे लागते. यामध्ये अधिक वेळ जातो. त्यामुळे पोलीस कर्मचारीदेखील मोठ्या वाहनांवर कारवाई करताना तत्परता दाखवीत नसल्याचे दिसून येते. नो पार्किंग झोनमध्येदेखील मोठी वाहने तासन्तास तशीच उभी असतात. यामुळे अपघाताचा धोका संभावतो.
‘नो पार्किंग’मध्येच लावा चारचाकी
By admin | Updated: June 6, 2015 23:41 IST