पिंपरी : भरधाव वेगात असताना वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येत असलेली ८ वाहने एकमेकांवर आदळली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर कासारवाडी येथील सॅन्डविक कंपनीसमोर शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. सकाळी साडे अकरापासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. रस्तेही घसरडे झाले होते. दरम्यान, कासारवाडी येथे आतील रस्त्यावरून जात असताना एका वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या मोटारी एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर कासारवाडी ते फुगेवाडी या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने हटविल्यानंतर वाहतूक सुरु झाली. अपघात पाहण्यासाठी दुसऱ्या लेनमधील वाहनेही थांबत असल्याने त्या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. पावसात रस्ते निसरडे होतात. यामुळे थोडा ब्रेक दाबला तरी वाहने घसरण्याची भीती असते. यासह वाहनाला उगळलेले टायर असल्यानेदेखील घसरतात. यासाठी वाहनाचा वेग कमी ठेवून वाहन चालविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कासारवाडीत आठ वाहने एकमेकांवर आदळली
By admin | Updated: July 14, 2014 04:55 IST