पुणे : आज विज्ञान आणि तंत्रज्ञान नवे रूप धारण करून समोर येत आहे. नवनवीन संशोधनातून अनेक गोष्टी मांडल्या जात आहेत. या गोष्टी वरवर आकर्षक वाटत असल्या तरी त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. विज्ञान ही एक शक्ती आहे. मात्र, तिला अनेक मर्यादाही आहेत. त्या समजून घेण्यासाठी विज्ञानकथा उपयुक्त ठरतील, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि ‘सरहद’च्या वतीने घुमानच्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत डॉ. नारळीकर यांचे ‘माझे विज्ञानकथा विश्व’ या विषयावर मंगळवारी व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. मंगला नारळीकर, डॉ. माधवी वैद्य, संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, संजय नहार उपस्थित होते.नारळीकर म्हणाले, ‘‘विज्ञान जर गोष्टीच्या रूपात मांडले गेले तर वाचक विज्ञानाच्या अधिक जवळ पोहोचू शकतील. आजच्या विज्ञानकथा या उद्याच्या वास्तवात परावर्तित होऊ शकतात. एखादी छोटीशी कल्पनाही उत्तम विज्ञानकथा होऊ शकते.’’ प्रास्ताविक माधवी वैद्य यांनी केले. मिलिंद भोई यांनी नारळीकर यांचा परिचय करून दिला.(प्रतिनिधी)विज्ञानकथा निश्चितच उपयुक्त४डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘एकविसाव्या युगात विज्ञानाने गरूडझेप घेतली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालून नव्या स्वरूपात जगासमोर येत आहे. मात्र, त्याची स्थिती एखाद्या बुफे डिनरसारखी झाली आहे. ताटात सगळे भरून घेण्याची आणि ते खाण्याची इच्छा होते; मात्र त्याचे अतिरिक्त सेवन झाल्यास दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. तसेच या दोन्हींचे झाले आहे. कोणताही सारासार विचार न करता त्याला जीवनात प्रवेश दिला जात आहे, ज्यामुळे त्रास वाढत आहे. विज्ञान ही शक्ती असली तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. त्या ओळखायच्या असतील आणि त्यावर उपाययोजना समजून घ्यायच्या असतील, तर विज्ञानकथा निश्चितच उपयुक्त ठरतील.’’
विज्ञानाच्या मर्यादा ओळखा
By admin | Updated: January 21, 2015 00:46 IST