या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी प्रज्ञा चव्हाण यांनी अहवालवाचन केले. त्यानंतर सरपंच विशाल बारवकर, उपसरपंच गणेश जाधव यांनी अहवालवाचनाला तसेच विविध मागण्यांना दाद देत वैचारिक दृष्टिकोनातून मार्ग काढत उपस्थित नागरिकांची प्रश्ने ही या पंचवार्षिक योजनेत मार्गी लावण्याच्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला.
ग्रामसभेत प्रथम जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उपस्थित महिला-बांधवांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी कमिन्स इंडिया या संस्थेच्या अधिकारीवर्गाने वारी मार्ग जलजीवन अभियान गावामध्ये राबविणे, पर्यावरण वाचविण्यासाठी जनजागृती करणे याविषयी मार्गदर्शन केले. दिनेश कुलकर्णी यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी पोस्ट खात्यात सुकन्या योजना सुरू करण्याचे आवाहन केले.
यावेळी देऊळगावगाडा ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असलेल्या सर्वच ठिकाणच्या अंगणवाड्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शौचालय दुरुस्ती, नवीन इमारत बांधकाम करणे या मागण्या मांडण्यात आल्या. ग्रामपंचायतमार्फत विविध समित्यांवर ग्रामपंचायत सदस्यांची नेमणूक करण्यात आली. वाड्या-वस्त्यावरील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, सार्वजनिक सभागृह, मंदिर परिसर सुव्यवस्थापन, दलित घरकुल योजना हे विषय मार्गी लावण्यासाठी सरपंच विशाल बारवकर, उपसरपंच गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारवकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात आश्वासन दिले. वरवंड तलाव ते बारवकर वाडी पाणी योजना करण्याच्या संदर्भात अहवाल वाचन करण्यात आला. येथील ग्रामस्थ दत्ता रासकर यांनी वाॅर्ड क्र. २ मध्ये रस्त्यांची बिकट अवस्था असून, पाणी योजना कमकुवत आहे. हे झाले नाही तर या वार्डमधील एकाही ग्रामस्थांची घरपट्टी व पाणीपट्टी मागण्याचा अधिकार ग्रामपंचायतला नाही, असे म्हटल्यावर आपण लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन सरपंच विशाल बारवकर यांनी दिले. ग्रामविकास अधिकारी प्रज्ञा चव्हाण यांनी १५ व्या वित्त आयोग निधीच्या संदर्भांत वाचन केले. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारवकर यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १०० टक्के कामे स्थानिक नागरिकांना मिळण्याच्या संदर्भात मागणी केली.
या प्रसंगी सरपंच विशाल बारवकर, उपसरपंच गणेश जाधव, अक्षय बारवकर, ग्रामविकास अधिकारी प्रज्ञा चव्हाण, दत्ता रासकर, श्रद्धा गवळी, भाऊसाहेब शितोळे, राजवर्धन जगताप, संतोष मोरे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामसभेस उपस्थित होते.
फोटोओळ : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथील ग्रामसभा ही कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद न होता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली गेली. यावेळी विविध विकासात्मक धोरणावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.