चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीमधील म्हाळुंगे इंगळे गावच्या हद्दीतील 'ड्रीम प्लास्ट इंडिया प्रा. लि. या लहान मुलांची खेळणी बनविणार्या कंपनीला आज (दि. ६) पहाटे पावणेसहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कारखाना यंत्रसामग्रीसह जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसून, या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची शक्यता असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. चाकण औद्योगिक वसाहत महाळुंगे गावच्या हद्दीत गट नं. १४७, प्लॉट नं. १५ व शेड नं. २ मध्ये ड्रीम प्लास्ट इंडिया प्रा. लि. ही किंडरजॉय चॉकलेटसाठी लहान मुलांची खेळणी उत्पादित करणारी प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंग कंपनी आहे. कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या स्टोअर्स डिपार्टमेंटला सर्वप्रथम आग लागल्याचे कामगारांनी सांगितले. स्टोअर्समधील प्लॉस्टिकचा कच्चा माल व ऑईलमुळे आगीने उग्र रूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच रात्रपाळीचे सर्व कामगार व पहिल्या पाळीसाठी आलेले कामगार यांना परत घरी पाठविण्यात आले. चाकण एमआयडीसीतील महिन्द्रा व्हेईकल्स, बजाज अँटो, फोक्सवॅगन, अँटलस कॉप्को, एमआयडीसी आदींकडून फायर ब्रिगेडच्या गाड्या आग विझविण्यासाठी पाठविण्यात आल्या. (वार्ताहर) चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे येथील ड्रीम प्लास्ट इंडिया प्रा. लि. या खेळणी बनविणार्या कंपनीला रविवारी पहाटे आग लागली.
चाकणनजीक भीषण आग
By admin | Updated: July 7, 2014 05:39 IST