लोणी काळभोर : कामगारांचा पगार करण्यासाठी बँकेतून काढून दुचाकीच्या डिकीवजा कातडी पिशवीत ठेवलेली १ लाख ७६ हजारांंची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उरुळी कांचन येथे घडली.पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर बबन बोराटे (वय ३६, रा. नांदुर, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली. चोरीचा हा प्रकार १० जुलै रोजी दुपारी १.४0 वाजण्याच्या सुमारास घडला.बोराटे व राहुल गुरव (रा. हडपसर, पुणे २८) या दोघांचा भागीदारीत खेडेकर मळा, उरुळी कांचन येथे श्रीगणेश एंटरप्राईजेस या नावाचा पेपर क्लीप तयार करण्याचा कारखाना आहे. गुरुवार, दि. १0 जुलै रोजी बोराटे यांनी कामगारांचा पगार करण्यासाठी बॅँक आॅफ महाराष्ट्र उरुळी कांचन शाखेत धनादेश देऊन १ लाख ७६ हजार रुपये रोख काढले व ती रक्कम दुचाकीच्या डिकीवजा कातडी पिशवीत ठेवली. आश्रम रोडवरील डॉ. शिरोळे यांचे रुग्णालयांत त्याच्या मित्राचा भाऊ आजारी असल्याने त्याला भेटण्यासाठी दुपारी १.३५ वाजण्याच्या सुमारास दुचाकी रुग्णालयाच्या बाहेर लावून ते गेले. पाचच मिनिटांनी ते परत दुचाकीजवळ आले, पैसे ठेवलेल्या कातडी पिशवीचे बटण निघालेले आढळले म्हणून त्यांनी पाहणी केली असता, पैसे दिसले नाहीत. अखेर ११ जुलै रोजी त्यांनी उरुळी कांचन दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली.(वार्ताहर)
डिकीतून पावणे- दोन लाखांची रोकड लंपास
By admin | Updated: July 14, 2014 05:09 IST