डॉ. अनिल अवचट, मुक्ता पुणतांबेकरआम्हाला दोन मुली. यशोदा व मुक्ता. त्यांनी त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगावं एवढंच आम्हाला वाटायचं. बाकी कोणतीही अगदी शाळेत जायचा का नाही, याबाबतही त्यांच्यावर मी आणि पत्नी सुनंदा हिने काहीही लादलं नाही. त्यांनी शाळेत जावं का नाही हा निर्णय त्यांनी घ्यावा, असं एका मित्राजवळ बोललो तेव्हा तो म्हणाला, मग त्यांना कधीच जावं वाटणार नाही. मग नाही जाणार. यावर मित्र पुन्हा आश्चर्याने म्हणाला, शिकल्या नाही तर काय करणार?’ ‘धुणी-भांडी करतील. त्यात त्यांना आनंद मिळाला तर झालं. धुणी-भांडी कमीपणाचं असं कशावरून म्हणायचं.’ पण मुली शाळेत जाऊ लागल्या. त्यांना मिश्र स्तर अनुभवता यावा यासाठी येरवडा येथील झोपडपट्टी परिसरातील पालिकेच्या शाळेत घातले. तिथे त्या छान रमल्या. आठवीत असताना तर एकदा मुक्ताने, मला शाळा सोडायची असे जाहीर केले. त्या वेळी मी एका मासिकात संपादक होतो. तिथे माझ्यासोबत आली. कंपोझ कसे करतात, ब्लॉक मेकिंग कशी सुरू आहे हे तिने अनुभवले. दुसरा दिवस ही असाच. शेवटी संध्याकाळी ती म्हणाली, उद्यापासून जाते मी शाळेला. बाबाच्या कामापेक्षा शाळा जास्त चांगली हे तिचे तिलाच कळले. अभ्यास करा असे कधीच आम्ही उच्चारले नाही. आनंदाने आणि मनाला पटलं तर करावं इतकंच अपेक्षित होतं. पुढे १२ वीला मुक्ता पुण्यात मुलींमध्ये प्रथम आली. त्या वेळी आम्ही कधी त्यांना गाईड दिले नव्हते की क्लास लावले नव्हते. दरम्यान, तिला गिर्यारोहणाचा छंद जडला होता. हिमालयात जाऊन आली. पक्षीनिरीक्षण सुरू केले. त्यांचा मोठा गु्रप रात्री ३-३ वाजेपर्यंत गप्पा मारीत, रात्रीच ट्रेकिंगला जात. आम्हीही कधी अडवले नाही. पुढे तिने आर्टस्मधून सायकॉलॉजी विषय घेतला होता. एम. ए. क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पुणे विद्यापीठात मुक्ता पहिली आली. सुवर्णपदक पटकावले. त्याच सुमारास तिची आई सुनंदा ही कॅन्सरशी झुंज देत होती. मुक्तांगणचे मोठे काम पसरले होते. त्या वेळी तिला वाटले आईला थोडी मदत करावी म्हणून ती मुक्तांगणमध्ये येऊ लागली. शिवाय तिला पीएचडीचा काही विषय मिळतो का हेही पाहायचे होते. तोपर्यंत आम्ही कधीही मुक्तांगणमध्ये ये असे म्हटले नव्हते. आईचे काम पाहून ती प्रभावीत झाली. आईकडेच इतकं शिकायला आहे तर पीएचडी कशाला करायची म्हणून तिने ते सोडले. सुनंदा प्रशासकीय कामांना कंटाळायची. मग सुरूवातीला मुक्ताने ती जबाबदारी स्वीकारली. सुनंदाच्या मृत्यूनंतर तर सर्व मुक्तांगणच ती सांभाळत आहे. तिच्या दोन्ही मुलांकडेही छान लक्ष देते. स्वत:ला शारीरिकदृष्ट्याही फीट ठेवले आहे. आता हळूहळू ती मुक्तांगणच्या बाहेर पडू लागली आहे. तिने लेखनाचेही मनावर घेतले आहे. लिहायचं तर कसा वेळ काढायचा, कसे लिहायचे याविषयी सांगत आहे. हे सगळं पाहून छान वाटते, आनंद वाटतो. काहीही लादले नाही..आई-बाबांनी कधीच आमच्यावर हेच करा, तेच करा म्हणून लादले नाही. कायम मैत्रीचं नातं राहिलं. बाबा तर बाबा कमी आणि मित्र म्हणूनच जवळचा वाटला. त्यांनी अमुक काही शिकवलं नाही. त्यांना पाहून, नकळतपणे आम्ही शिकत गेलो. डॉक्टर असून ही साधे राहणारे, कोणालाही तुच्छ न समजणारे, प्रेमाने वागणारे असेच पाहिले. त्यामुळे तसेच आमच्यामध्येही उतरत गेले. त्यांची प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचारसरणी असते. अगदी आईला कॅन्सर झाला होता तरी आई म्हणायची, बरं झालं कॅन्सर झाला. अचानक अपघाताने मेले असते तर कामं कशी झाली असती. आता कमी वेळात भरपूर कामे करायची आहेत. बाबांनीही तिला तशीच साथ दिली. ती आजारी होती पण घर कधीच आजारी झाले नाही. त्यांनी जगाला सांगितलेली सगळी मूल्ये स्वत: अमलात आणली. तेच आम्हीही करत आहोत. - मुक्ता पुणतांबेकर
मुभा दिली... त्या जगत गेल्या...
By admin | Updated: March 8, 2015 01:09 IST