पिंपरी : ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील प्रतिकुटुंबास दोन प्लॅस्टिक डबे मोफत देण्यात येणार आहेत. महापालिकेने खरेदी केलेले साडे नऊ लाख डबे धूळखात पडून होते. त्यांच्या वाटपाला अखेर प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त मिळाला आहे. शहरातील घराघरांत हे डबे वाटणार असल्याची माहिती महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांनी दिली. प्रातिनिधिक स्वरूपात २६ जानेवारीला कासारवाडी येथे सकाळी ११ ला महापौर धराडे यांच्या हस्ते कचऱ्याच्या डब्यांचे वाटप होणार आहे. त्यानंतरचे वाटप क्षेत्रीय कार्यालयामार्फत होईल. कोट्यवधी रुपये खर्चून पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९ लाख ५७ हजार ९६९ डब्यांची खरेदी केली. १० महिन्यांपासून हे डबे गोदामात पडून होते.कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे शक्य व्हावे, शहर स्वच्छ ठेवण्याचा उद्देशही सफल होईल, या हेतूने महापालिकेने मार्च २०१४ मध्ये ६ कोटी ५९ लाख ६१ हजार २८९ रुपये खर्चून पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे प्रत्येकी ४ लाख ६५ हजार १७२ असे एकूण ९ लाख ३० हजार ३४४ डबे खरेदी केले आहेत. शिवाय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधीतून २७ हजार ३५२ डबे उपलब्ध झाले आहेत. (प्रतिनिधी)वाटपासाठी ११३७ कर्मचारी तैनातडब्यांवर स्टीकर लावण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च केला आहे. तसेच या वेळी नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याविषयी ५ लाख माहितीपत्रके वाटण्यात येणार आहेत. वाटपासाठी हजार कुटुंबांसाठी १ याप्रमाणे ५४४ कर्मचारी ठेवण्यात आले असून, त्यांच्या मदतीसाठी आणखी ५४४ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पर्यवेक्षणासाठी ६ सहायक आरोग्याधिकारी, ७ मुख्य आरोग्य निरीक्षक, ३६ आरोग्य निरीक्षक असे एकूण ११३७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. ३१ जानेवारीपर्यंत डबे वाटपाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
घरोघरी कचऱ्याचे मोफत डबे
By admin | Updated: January 23, 2015 00:31 IST