पिंपरी : राज्यात दुष्काळाचे भीषण रूप आहे. नापिकीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशा दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील तरुण आणि तरुणींचे मोफत विवाह केले जाणार आहेत. अशा कुटुंबांसह वऱ्हाडी मंडळीचा प्रवास आणि निवास खर्चासह संपूर्ण पोशाख आणि संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम येथील जाणीव फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे.फाउंडेशनतर्फे दर वर्षी बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा घेतला जातो. सर्वधर्मीय आणि जातींचे वधू-वर सहभागी होतात. शाही थाटात हा सोहळा रंगतो. आकर्षक रथात बॅण्ड, ढोल-ताशे, वाजंत्री, हलगी अशा वाद्यवृंदासह मोठ्या थाटात वराची मिरवणूक काढली जाते. यंदाच्या वर्षी राज्यातील भीषण दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन काही भागातील तरुणींनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने २४ तरुणींनी लग्न न करण्याचे जाहीर केले होते. पैशांअभावी अनेकांनी मुलींचा विवाह रद्द केले आहेत. या परिस्थितीचा विचार करून जाणीव फाउंडेशन कुटुंबांच्या मदतीसाठी सरसावले आहे.विदर्भ, मराठवाडा, खान्देश या दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबातील तरुण-तरुणींचाही विवाह या सोहळ्यामध्ये केला जाणार आहे. या वधू-वर आणि वऱ्हाडींचा गावापासून पिंपरी विवाहस्थळापर्यंत ये-जा करण्याचा प्रवास आणि निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. वधूला दोन साड्या, वरास सफारीचे कापड, तसेच २१ भांड्यांचा संच भेट असणार आहे. हळदी समारंभ, भोजन व्यवस्था केली जाते. सोहळा २४ एप्रिलला आहे. या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त भागांतील उपवर मुलींचे विवाह पैशाअभावी रद्द करावे लागणार नाहीत. कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांवर लग्नाच्या एका पैशाचाही भार पडणार नाही. उलट थाटामाटात शाही पद्धतीने त्यांच्या मुला-मुलीचा विवाह होणार आहे. (प्रतिनिधी)शेतकरी कुटुंबास दिलासावडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने २४ तरुणींनी लग्न न करण्याचे जाहीर केले होते. पैशांअभावी अनेकांनी मुलींचा विवाह रद्द केले आहेत. या परिस्थितीचा विचार करून जाणीव फाउंडेशन अशा शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी सरसावले आहे.
दुष्काळग्रस्त शेतकरी पाल्यांचा मोफत विवाह
By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST