विश्वास मोरे ल्ल पिंपरीमोबाईलवर कॉल आल्यानंतर समोरील सुमधूर असा महिलेचा आवाज, ‘नमस्कार, आपण खूप भाग्यवान आहात. आमच्या कंपनीने घेतलेल्या ‘लकी ड्रॉ’मध्ये आपण भाग्यवान ठरला आहात. आमच्याकडून विशेष पर्यटनाचे पॅकेज भेट म्हणून देण्यात येत आहे. आमच्या कार्यालयात येऊन भेटा. आपले बक्षीस घेऊन जा.’’ असे सांगून फसव्या पर्यटनांच्या योजना माथी मारण्याचे प्रकार घडत आहेत. फसव्या पर्यटन पॅकेजचे पेव फुटले आहे. असा कॉल आपणासही येऊ शकतो, त्यामुळे सावधान...मार्केटिंगचे विविध फंडे वापरून सामान्य माणसांना गंडा घालण्याचे विविध प्रकार उघडकीस येत आहेत. मात्र, फसविणाऱ्यांकडून दाखविण्यात येणाऱ्या ‘अधिकचा फायदा’ या अमिषाला, भुलभूलैय्याला बळी पडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. सध्या मॉल संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला आहे. कोणत्या ना कोणत्या मालावर, वस्तूवर सुट, एका वस्तुवर दुसरी वस्तू भेट देण्याचे, मुळ किंमतीत सुट देण्याचे फॅड वाढले आहे. याचा फायदा घेऊन फसविणाऱ्या कंपन्यांनी मॉलमध्ये येणाऱ्या सामान्य, मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय लोकांना लक्ष्य केले आहे. शहरात चिंचवड स्टेशन येथे दोन, काळेवाडी एक, प्राधिकरणात एक, फुगेवाडीत एक असे प्रमुख मॉल आहेत. मॉलमध्ये प्रवेश केल्यानंतरच समोरच टेबल टाकून विविध योजना विकणारे विपन्नन अधिकारी बसलेले दिसून येतात. त्याच्या हातात कुपन असतात. ही कुपन माथी मारण्याचा प्रकार सुरू असतो.अशाच एका मॉलचा अनुभव : मॉलमध्ये गेल्यानंतर एका व्यक्तीने सुहास्यवदने एक कुपन हातात टेकविले. कृपया, आपली माहिती भरून घ्या, आमच्या कंपनीची ग्राहकांची योजना आहे. यातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे, असे सांगितले. त्यावर नाव, व्यवसाय, पत्ता, दूरध्वनी क्रमांक अशी माहिती भरून दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी फोन आला. समोरून सुमधूर आवाजात एक महिला बोलत होती, नमस्कार सर, आमच्या कंपनीच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात तुम्ही भाग्यवान ठरला आहात. आपणास आमच्या वतीने बक्षीस देण्यात येत आहे. आपण आमच्या औंध येथील कार्यालयात येऊन भेटा, येताना जोडीने यायचे आहे, असे सांगून त्या महिलेने अपॉइमेंटची वेळ ठरवून घेतली. त्यानंतर ठरल्यावेळी कार्यालयात गेल्यानंतर सुरूवातीला एका फॉर्मवर माहिती भरून घेण्यात येते. त्यानंतर पंधरा मिनिटाचे प्रेझेंटेशन दाखविण्यात आले. सुरूवातीला सहभागी झाल्याबद्दल एक भेट दिली. तसेच एक कुपनही देण्यात आले. त्यानंतर माहितीसत्रात संस्थेची माहिती, संस्थेचे उपक्रम, कोणत्या प्रकारचे काम होते याची माहिती देण्यात आली. तसेच आपण आमच्या संस्थेत सहभागी झाल्यानंतर आपणास कोणते फायदे होऊ शकतात.या प्रकल्पाचे दूरगामी फायदे काय आहेत याची माहिती करून दिली. गिफ्टचा आकार व मिळालेले पाकिट पाहून खूप काही मिळाल्याचा आनंद जोडप्याच्या चेहऱ्यावर दिसून आला. मात्र, गिफ्ट उघडून पाहिल्यानंतर काचेचा बाऊल होता. त्यावेळी झालेला संबंधित जोडप्याचा चेहरा पाहण्याजोगा होता. संबंधित कंपनीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कुपनात ट्रॅव्हल पॅकेज संदर्भात मजकूर असतो. आपणास आम्ही ट्रॅव्हल पॅकेज देत आहोत. त्यात चार दिवस आणि तीन रात्रीचा समावेश आहे. हे कुपन आपण देशात किंवा परदेशातील हॉटेलमध्ये वापरू शकता. यासाठी आमच्या कंपनीत पंधरा हजार रूपये भरावे लागतील. ही रक्कम भरली की आणखी योजनांचाही लाभ आपणास मिळविता येईल. हे कुपन घेऊन आपण प्रवासाला गेला तर संबंधित हॉटेलावर आपणास सुटही देण्यात येईल, अशी माहिती देण्यात येते. तसेच गुंतवणूकीसंदर्भात असणाऱ्या विविध योजनांमध्ये आपणास सहभागी होता येईल, त्यातून तुम्हाला अधिकचे उत्पन्न मिळेल, असे अमीषही दाखविण्यात येते. या सर्वांची पहिली पायरी ट्रॅव्हल पॅकेज योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात संबंधित कुपनात कोणताही उल्लेख नसतो. कोणत्या हॉटेलात हे कुपन वापरता येईल. याविषयीची माहिती त्यावर नसते.
फसव्या पर्यटन पॅकेजचे फुटले पेव
By admin | Updated: January 23, 2015 00:30 IST