महेंद्र कांबळे ल्ल बारामतीदर्जेदार डाळिंबाची निर्यात होण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) पणन मंडळाच्या वतीने बारामतीसह राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये डाळिंब उत्पादकांसाठी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजना राबविण्यात येणार आहे. पथदर्शी योजना म्हणून बारामतीला पहिला मान मिळाला आहे. डाळिंबाची जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील डाळिंब उत्पादकांना यामध्ये समावून घेण्यात येणार आहे. पिके, फळभाज्यांवर विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर केला जातो. विशेषत: फळांवर निर्यात करताना या औषधांचा अंश नसावा. त्यामुळे निर्यातीला अडथळा येतो. काही वर्षांपूर्वी आंब्यासह अनेक फळांवर युरोपीयन राष्ट्रांमध्ये याच कारणांमुळे निर्यातीला बंदी आली होती. त्यामुळे ‘अपेडा’ व पणनमंडळाच्या संयुक्त उपक्रमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव यावा, यासाठी डाळिंब, केळी, भाजीपाल्यांचा दर्जा चांगला राहावा, यासाठी ‘क्लस्टर’ विकसित करण्यात येत आहे. त्याची सुरुवात डाळिंब या फळापासून करण्यात आली आहे. या संदर्भात आज ‘लोकमत’शी बोलताना अपेडाचे महाव्यवस्थापक डॉ. तरुण बजाज यांनी सांगितले की, यामध्ये शेतकरी, निर्यातदारांना बरोबर घेऊन क्लस्टर उभारणी केली जाणार आहे. यामुळे डाळिंब निर्यातीला आणखी चालना मिळेल. त्या दृष्टीने अपेडाचे प्रयत्न सुरू आहेत. अपेडाचे पश्चिम विभागाचे उपमहाप्रबंधक डॉ. सुधांशु यांनी सांगितले, वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक अपत्तीमुळे शेतकरी, डाळिंब उत्पादक औषधांची फवारणी करतो. त्यामुळे निर्यातीसाठी अनेकदा माल नाकारला जातो. हे टाळण्यासाठी क्लस्टर विकास योजना राबविण्यात येत आहे.बारामतीसह इंदापूरमध्ये डाळिंब निर्यात केंद्र आहे. त्याचबरोबर अन्य पायाभूत सुविधा असल्यामुळे बारामतीसह आसपासच्या चार ते पाच जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांना या क्लस्टरमध्ये समावून घेतले जाणार आहे. ‘महाआनार’चे प्रभाकर चांदणे यांनी अपेडाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. डाळिंब उत्पादकांना त्याचा निश्चित फायदा होईल, असे सांगितले.सध्या उत्पादित झालेले डाळिंब मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये आणले जातो. मात्र, निर्यातदारांना शेतकऱ्याने डाळिंबासाठी वापरलेली औषधे, कीटकनाशके आदींची माहिती नसते. उत्पादक ते निर्यातदार यांचा दुवा म्हणून क्लस्टर विकसित केले जाणार आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळेल. कृषी माल निर्यातीला अधिक चालना देण्यासाठी अपेडाने हा प्रयत्न केला आहे. डाळिंबानंतर केळीसह अन्य फळे, भाजीपाल्याची निर्यात देखील करण्यासाठी क्लस्टर उभारले जाणार आहेत.- पूनम मेहता, पणन मंडळाच्या निर्यात विभागाच्या उपमहाप्रबंधक
बारामतीत डाळिंबासाठी पहिले ‘क्लस्टर’
By admin | Updated: January 23, 2015 23:39 IST