प्रशासन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पद्मावती दिंडे यांच्या विरोधात प्राथमिक शिक्षक संघाने गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत. शिक्षक संघाच्या या ‘लेटरबॉम्ब’रुपी निवेदनामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत शिक्षण उपसंचालकांकडे विविध आरोपांबाबतचे पत्र देण्यात आले आहे. दिंडे यांचेवर नियमबाह्य कामकाजामुळे तत्काळ कारवाई करण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे.
शिक्षकांना अपमानास्पद वागणूक देणे, मानसिक त्रास देणे, तीन अपत्यांच्या मुद्यांवरून दोन शिक्षिकांकडून प्रत्येकी दोन लाख दहा हजार रुपये घेणे, विनावेतनाच्या नावाखाली एक दिवसाचे वेतन घेणे, स्तनदा मातेस सर्वेक्षणाची सक्ती करणे, कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी रजा नाकारणे अशा स्वरूपाचे आरोप दिंडे यांच्याविरुध्द बारामती नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे. सदरच्या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. श्रीमती दिंडे यांचेवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत दिंडे या आरोपांमध्ये काडीचेही तथ्य नाही, हे आरोप बिनबुडाचे असल्याचा खुलासा दिंडे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, काही शिक्षक शाळेवर नसतात. त्यांना नोटिसा दिल्या. त्यातून जाणीवपूर्वक हे आरोप करण्यात आले. आर्थिक आरोप तर पूर्णत: बिनबुडाचे आहेत. निवेदनावर ज्या शिक्षकांच्या सह्या घेण्यात आल्या, त्यांनीच संघाने दबावापोटी सह्या घेतल्या असल्याचे पत्र उपसंचालक कार्यालयाला दिले आहे. नगरपरिषद शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी मी प्रयत्न करत आहे. परंतु काहींना शाळेतील कामच नकोसे असल्याने बदलीच्या काळात त्यांच्याकडून द्वेषापोटी आरोप केले जात असल्याचे दिंडे म्हणाल्या.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही या तक्रारीचे निवेदन शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्याधिकारी किरणराज यादव यांना या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.