पुणे : गेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये झालेले अनुचित प्रकार या वेळी घडणार नाहीत, याची गणेश मंडळांनी काळजी घ्यावी. पोलिसांनी गेल्या वर्षी सामंजस्याने घेतले; परंतु या वर्षी गणेशोत्सवात कायदा हातामध्ये घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराच पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिला आहे. ढोल-ताशा पथकांनी टोलऐवजी ढोल वाजवावा. यासोबतच हेल्मेट व वाहतुकीच्या नियमांबाबत जगजागृती करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही माथूर यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक पोलीस मुख्यालयात आयोजित केली होती. त्या वेळी माथूर बोलत होते. या वेळी पोलीस अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) चंद्रशेखर दैठणकर, पोलीस, सह. पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस उपआयुक्त संजय पाटील, पोलीस उपआयुक्त एम. बी. तांबडे व गणेश मंडळाचे कार्यकर्ते, तसेच ढोल-ताशा पथकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यंदाचा गणेशोत्सव चैतन्यमयी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वनिर्बंध घालून घेण्याची आवश्यकता आहे. तसेच, मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली गरजेची असून, नोंदणीकृत मंडळांव्यतिरिक्त कोणी वर्गणी मागितल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त दैठणकर या वेळी म्हणाले. रस्त्याच्या एक तृतीयांश भागात मंडप उभारायला परवानगी देण्यात येणार आहे. मंडप पक्क्या स्वरूपाचा असावा. मंडळांनी मंडपात अग्निप्रतिरोधक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दैठणकरांनी दिल्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह व भावना दुखावणारे देखावे टाळावेत. मंडपात २४ तास स्वयंसेवक नेमावेत. पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांकडून संकेतस्थळावर सूचना मागवल्या होत्या. परंतु, त्याला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल व हँड डिटेक्टरची सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करावी, असेही आवाहन या वेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)
कायदा हातात घेऊ नका
By admin | Updated: August 11, 2014 03:50 IST