बारामती : वाटमारी करणाऱ्या टोळीस बारामतीच्या गुन्हेशोध पथकाने जेरबंद केले. या टोळीतील आरोपींवर शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपी शरद बाबूराव बिबे (वय २३, रा. मळद), अक्षय ऊर्फ छोटा विमल कांतीलाल जमदाडे (वय १८, रा. जळोची), दीपक अप्पासो धर्मे (वय २०, रा. झारगडवाडी) या तिघांसह सूर्यनगरीत राहणाऱ्या बालगुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. ५ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अमित राजेंद्र जगताप (रा. सूर्यनगरी, बारामती) हे हॉटेल हेरिटेजच्या मागे चिंचेच्या झाडातून घरी जाताना एक पल्सर, होंडा दुचाकी असणाऱ्या चौघा जणांनी त्यांना अडविले. तसेच, जबर मारहाण करून त्यांच्याकडील तीन मोबाईल हँडसेट, रोख रक्कम असा एकूण २२ हजार ३५० रुपयांचा ऐवज पळवून नेला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ६ जुलै रोजी साडेबाराच्या दरम्यान नीलेश विलासभाई कोठारी (रा. मार्केट यार्डसमोर, इंदापूर रोड, बारामती) हे कै. वसंतराव पवार मार्गावरून तावरे बंगल्यासमोरून निघाले होते. या वेळी दोन दुचाकीवरील चौघा जणांनी कोठारी यांची दुचाकी अडविली. तसेच, त्यांना जबर मारहाण करून नीरा डावा कालव्यात ढकलून दिले. या वेळी त्यांच्या खिशातील दोन मोबाईल हँडसेट, रोख रकमेसह २१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच त्यांच्या खिशातील एटीएम कार्ड घेऊन त्याद्वारे एटीएममधून पैसे काढून घेतले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी निकम, अशोक पाटील, बाळासाहेब भोई, अनिल काळे, रविराज कोकरे, संदीप मोकाशी, संदीप कारंडे, ज्ञानदेव साळुंके, सदाशिव बंडगर यांनी शोधमोहीम राबविली. ४६ हजार ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे. (प्रतिनिधी)
वाटमारी करणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: July 13, 2015 23:56 IST