पुणे : ‘शिक्षण हक्क कायद्या’नुसार प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, यामुळे राज्यातील सर्व दगडखाणीतील कामगार वस्त्यांमध्ये पाषाण शाळा सुरू कराव्यात. दगडखाणीतून स्थलांतरित होणाऱ्या सर्व जाती-धर्मातील बालकांसाठी निवासी पाषण शाळा सुरू करावे, या बालकांसाठी १० वीपर्यंत मोफत शिक्षण द्यावे, या बालकांच्या शालेय उपक्रमास येणार सर्व खर्च महाराष्ट्र खनिज विकास निधीतून करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी दगडखाण असंघटित कामगार विकास परिषदेच्या वतीने गुरुवारी शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर ‘धरणे आंदोलन’ करण्यात आले.याबाबत संघटनेचे अध्यक्ष अॅड. बी. एम. रेगे यांना सांगितले की, राज्यात सुमारे २० हजारांहून अधिक दगडाच्या खाणी असून, येथे तब्बल १५ लाखांपेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. या दगडखाण कामगारांचे सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक बालके आजही शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे हक्काच्या शिक्षणासाठी संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे दाद मागण्यात येत आहे. परंतु, प्रशासनाकडून याबाबत योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हे ‘धरणे आंदोलन’ करण्यात आले असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
पाषाण शाळांसाठी ‘धरणे आंदोलन’
By admin | Updated: January 23, 2015 00:21 IST