पुणे : शहरात आलेली डेंगी व चिकुनगुनिया यांची साथ रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, घनकचरा व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच आवश्यक त्या सर्व यंत्रणांनी रस्त्यावर उतरावे, असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी दिले. शहरातील डासनिर्मितीची ठिकाणे शोधण्याची मोहीम हाती घ्यावी, एकाच वेळी सर्वत्र धूरफवारणी करून साथ आटोक्यात आणावी या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.डेंगी, चिकुनगुनिया यांच्या साथीबाबत महापौरांनी बैठक घेतली. या वेळी उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आयुक्त कुणाल कुमार, आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते. साथ रोखण्यासाठी पालिकेकडून काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याचा आढावा या वेळी घेण्यात आला.प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम हाती घेण्यात यावी. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करावीत. रोपांच्या कुंड्या, फ्रिज, मनी प्लांट, बांबू ट्री, शोपीस आदी ठिकाणी डास उत्त्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी. या आजारांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवण्यात याव्यात. पावसाळा संपेपर्यंत या आजाराला पोषक असे वातावरण राहणार आहे. तरी त्याबाबतच्या योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. नागरिकांमध्ये तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पत्रके वाटण्यात यावीत.’’ दहा डॉक्टरांच्या घरीच डास उत्पत्ती केंद्रेमहापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन डास उत्पत्ती केंद्रांचा शोध घेतला जात आहे. घरात डास होऊ देऊ नका, असा सर्व रुग्णांना सल्ला देणाऱ्या शहरातील दहा डॉक्टरांच्या घरातच डास उत्पत्ती केंदे्र आढळून आली असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्याचबरोबर, पालिकेतील काही पदाधिकाऱ्यांच्या घरातही अशा प्रकारचे स्पॉट आढळून आले आहेत. महापौरांनी त्यांच्यासहित शहरात सर्वत्र घरोघर तपासणी करून तिथे डास उत्पत्ती केंद्र आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत.महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांसहित इतर कर्मचाऱ्यांच्या ५१४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य सेवेवर मोठा ताण येत आहे. कमला नेहरू हॉस्पिटलच्या प्रसूती विभागातील डॉक्टरांना ओपीडी पाहण्यासाठी पाठविले जाते. या पार्श्वभूमीवर, डॉक्टरांची उणीव जाणवत असतानाही पुरेसे डॉक्टर पालिकेकडे असल्याचा दावा प्रशासनाकडून बैठकीमध्ये करण्यात आला.महापालिकेच्या इमारतींमध्ये डास उत्पत्ती केंद्रेमहापालिकेच्या कसबा पेठेतील जन्म-मृत्यू कार्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात साहित्य अस्ताव्यस्त पडून त्या ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामध्ये डास उत्पत्ती केंद्रे निर्माण झाली आहेत, तरी संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांना नोटिसा बजावून तेथील सर्व अनावश्यक साहित्य हटविण्याच्या सूचना बैठकीमध्ये करण्यात आल्या.खासगी डॉक्टरांनी पालिकेला डेंगीचे रुग्ण कळविणे बंधनकारकशहरात सर्व खासगी हॉस्पिटल, क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आलेल्या रुग्णांमध्ये डेंगीचे रुग्ण आढळून आल्यास त्यांनी ते महापालिकेला कळविणे बंधनकारक आहे. याबाबत पालिकेकडून सर्व डॉक्टरांना त्याची माहिती द्यावी, डॉक्टरांकडून हे अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी पालिकेने यंत्रणा उभारावी आदी सूचना राज्याच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेला करण्यात आल्या आहेत.1शहरी गरीब योजना, सीएचएस योजना आदींची हॉस्पिटलची प्रलंबित बिले ताततडीने अदा करावीत, धूरफवारणीसाठी पालिकेकडे पुरेशी यंत्रणा नसल्यास धूरफवारणी करणाऱ्या खासगी संस्थांची मदत घेण्यात यावी, बांधकामाच्या साईट, पाणीसाठे करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा द्याव्यात. 2पालिका शाळांमधील पाण्याच्या टाक्यांना झाकणे बसवावीत. क्षेत्रीय कार्यालयाकडील धूरफवारणी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे दररोज आरोग्यप्रमुखांकडे रिपोर्टिंग करावे, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द कराव्यात, शहरात कुठे कचरा साठून देऊ नये आदी सूचना या बैठकीमध्ये करण्यात आल्या.