पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने पाणीसाठ्यात वाढ सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासांत सुमारे ०.१५ टीएमसी पाणीसाठा वाढला असून, हे पाणी शहराला आणखी पाच दिवस पुरेल एवढे आहे. गेले महिनाभर दडी मारलेल्या पावसाने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासांत या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक ५६ मिलिमीटर पाऊस टेमघर धरणात झाला. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू झाली असून, गेल्या चोवीस तासांत धरणातील उपलब्ध पाणीसाठा १.१५ टीएमसीवरून १.२७ टीएमसीवर पोहोचला आहे, तर या चारही धरणांमध्ये परिसरातील ओढे आणि नाल्यांच्या पाण्याचा ओढा सुरू झाल्याने पाणीसाठाही वाढण्यास सुरुवात झालेली आहे. (प्रतिनिधी)
धरणांमध्ये वाढला पाच दिवसांचा पाणीसाठा
By admin | Updated: July 15, 2014 03:55 IST