पुणे : नवरात्रोत्सव मिरवणुकीत तरुणाचा खून केल्याप्रकरणी व्यवस्थित तपास न केल्याबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढताना फिर्यादीने न्यायालयात सांगितलेल्या बाबी आणि जबाबात साम्य नसल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. ढवळे यांनी नगरसेवक प्रशांत शितोळेसह चौघांची गुरुवारी सुटका केली. प्रशांत कृष्णराव शितोळे (३६, रा. स्नेहांकित बंगला, शितोळेनगर, सांगवी), गणेश बाजीराव ढमाले (२४), अमित दिलीप गांधी (२७) व हर्षल माकर (२७, तिघेही रा. सांगवी) अशी सुटका करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. फिर्यादींना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रात्री दोन वाजेपर्यंत उपचार सुरू होते. मात्र, पोलिसांनी नोंदविलेली फिर्याद रात्री साडेबाराच्या सुमारास कशी नोंदविली गेली, बेशुध्द असताना तक्रार कशी नोंदवून घेण्यात आली, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. तसेच साक्षीदारांचे जबाबही पोलिसांनी सात दिवसांनी नोंदविल्याने, फिर्यादीच्या सांगण्यात आणि जबाबात तफावत आढळल्याने गुन्ह्याचा पोलिसांनी योग्य तपास लावला नाही, असे ताशेरे मारत न्यायालयाने आरोपींची मुक्तता केली. (प्रतिनिधी)
न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे
By admin | Updated: July 14, 2014 05:00 IST