भवानीनगर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा विस्तारवाढ, सहवीजनिर्मिती प्रकल्प संपूर्णपणे साखर आयुक्त तसेच शासनाने नेमलेल्या समितीमार्फत होणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. हे शेतकरी कृती समितीच्या लढ्याचे यश आहे, असे कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले. जाचक म्हणाले, कारखान्याच्या विस्तारवाढ, सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे २० आॅक्टोबर २००९ रोेजी भूमिपूजन झाले. ५ डिसेंबर २०१३ रोजी संचालक मंडळाची मुदत संपली. मुदत संपल्यानंतर दैनंदिन कामकाजाशिवाय कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, असे साखर अयुक्तांचे आदेश होते. या आदेशांचे पालन करण्याचे पत्र प्रादेशिक सहसंचालकांनी कारखान्याला दिले होते. भूमिपूजन झाल्यावर पाच वर्षे संचालक मंडळाने प्रकल्पाबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट मुदत संपल्यानंतर घाईने प्रकल्प उभारण्यासाठी संचालक मंडळाने हालचाली सुरू केल्या. शेतकरी कृती समितीचा या प्रकल्पाला कधीही विरोध नव्हता. तसेच पुढेही असणार नाही. कारखान्याला कोणताही स्थगिती आदेश नव्हता. उच्च न्यायालयाने हा प्रकल्प साखर आयुक्त, शासन नियुक्त समितीमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)
‘छत्रपती’चा वीजनिर्मिती प्रकल्प आयुक्तांमार्फत होणार : जाचक
By admin | Updated: July 14, 2014 05:13 IST