- रविकिरण सासवडे, बारामती
‘रोटी के पीछे भागना पडता है साहब। काहे की दिवाली? त्योहार मनाना बडे लोगों का काम है... बच्चे त्योहार का माहोल देखते हैं। मिठार्इंया देखते हैं तो खाने माँगते हैं... किसी होटल से लड्डू लाके देते हैं... बच्चे खुश होते हैं... उनके चेहरे का सकुनही हामारी दिवाली... दुख होता है इससे जादा बच्चों को कुछ नहीं दे सकते...’मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून आलेल्या अमनसिंग लोहार यांनी ही व्यथा मांडली. शिक्षणाचा गंध नसलेली ही कुटुंबे महाराष्ट्रासह कर्नाटकात रोजीरोटीसाठी फिरत आहेत. प्रत्येक गावात थांबून, दोन-तीन दिवस मुक्काम करून ही कुटुंबे शेती-उपयोगी अवजारे बनवतात. यामध्ये त्यांची चिल्लीपिल्लीदेखील आईबापाच्या जोडीने काम करतात. कोळशावर तापवलेल्या लोखंडाला हवा तो आकार देणारा हा समाज इच्छा असूनही आपल्या भविष्याला आकार देऊ शकत नसल्याचे वास्तव या वेळी अमनसिंग याने सांगितले. आजूबाजूला दिवाळी सणाला उत्साह ओसंडून वाहत आहे. मात्र, या गर्दीतही एका कोपऱ्यात आपले दुकान थाटून नशिबाचे घाव झेलत तापलेल्या लोखंडावर घणाने घाव घालताना हा समाज दिसत आहे.धार जिल्ह्यातील ढोलना गावातून मजल-दरमजल करीत ही कुटुंबे इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावात आली आहेत. लोखंडी हत्यारे घडवण्यात वाक्बगार असलेल्या या मेहनती लोकांना बोलते केले असता त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. गावाकडे शेतीवाडी नाही. घरे आहेत; मात्र ‘रोटी’ कमावण्यासाठी घरी वृद्ध आई-वडिलांना सोडून तरुण जोडपी मुलाबाळांसह फिरत आहेत. १२ वर्षांचा अर्जुन लोहार म्हणतो, ‘‘मेरी बहन मुझसे अच्छा पढती है.. मै भी पढता था.. माँ-बाप के साथ आया हूँ.. यहाँ तो हमारा स्कूल नहीं.. दिवाली नहीं करते..’’ एकीकडे दिवाळीसाठी काही महिने आधीच तयारी करणारा सुखवस्तू समाज, तर दुसरीकडे दोन वेळच्या अन्नासाठी पोराबाळांसह रस्त्याच्या कडेला थाटलेला संसार... ही दोन्ही चित्रे अस्वस्थ करणारी तर आहेतच; मात्र त्याहूनही समाजव्यवस्थेचे गंभीर वास्तव दाखवणारीदेखील आहेत. (प्रतिनिधी)