राजगुरुनगर : खेड तालुक्याचे पुरवठा निरीक्षक धारू भारमळ यांना शिधापत्रिका काढून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री येथे घडली. त्यांना साथ देणारा आंबोली (ता. खेड) येथील विशेष कार्यकारी अधिकारी अंकुश मारुती शिंदे यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत प्रकाश साळुंखे (रा. चाकण) यांना शिधापत्रिका काढायची होती. शिधापत्रिका अवघ्या ५० रुपयांमध्ये मिळत असताना त्यांच्याकडे ३ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. म्हणून त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली मोरे यांनी काल रात्री पावणेआठ वाजता राजगुरुनगर बसस्थानकाच्या उपाहारगृहात सापळा रचला. त्या वेळी आंबोलीचा विशेष कार्यकारी अधिकारी अंकुश मारुती शिंदे (सध्या रा. राजगुरुनगर, वय ३५) याला तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याचा साथीदार राजू खांडगे पळून गेला. शिंदे यांने आपण खेडचे पुरवठा निरीक्षक धारू भारमळ यांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे सांगितले. म्हणून पोलिसांनी धारू भारमळ यांनाही अटक करण्यात आले आहे. (वार्ताहर)
लाचखोर पुरवठा निरीक्षकास अटक
By admin | Updated: May 25, 2014 04:40 IST