पाटेठाण : राहूबेट परिसरात आडसाली ऊसलागवडीला वेग आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी ऊसबेणे महागल्याने जास्तीचे चार पैसे खर्चून उसाचे बेणे विकत घेण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी सरी पद्धतीऐवजी आधुनिक पट्टा पद्धतीने लागवड करण्यावर भर दिल्याचे एकंदरीत चित्र आहे.दौंड तालुक्यातील राहूबेट परिसर हा मुळा-मुठा व भीमा नदीच्या मुबलक उपलब्ध पाण्यामुळे हरितपट्टा म्हणून ओळखला जातो. या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले जाते. आडसाली व सुरू ऊस अशा दोन टप्प्यांत उसाची लागवड केली जाते. आडसाली उसाची लागवड जून तर सुरू उसाची लागवड नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत करण्यात येते. जास्तीत जास्त आडसाली लागवड करण्यावर विशेष भर दिल्याचे या परिसरात दिसत आहे. चांगल्या दर्जाचे ऊसबेणे निवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोएम-८६0३२, फुले -२६५ या प्रकारचे सुधारित वाण बेणे प्रक्रिया करून वापरण्यात येत आहे. लागवड करताना सरी पद्धतीऐवजी आधुनिक पट्टा पद्धतीने लागवड करण्यावर विशेष भर दिला जात आहे. दोन पट्ट्यातील अंतर हे साडेचार फूट ठेवण्यात येत आहे. चालू वर्षी उसाच्या बेण्याचे बाजारभाव वाढले असून, चार हजार रुपये प्रतिगुंठा या दराने खरेदी करण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे. या तुलनेत उसाला कारखान्यांकडून तसेच गुऱ्हाळाकडून मिळणारा बाजारभाव कमीच मिळत आहे. त्यातच मशागतीचे दर वाढले आहे. नांगरटीसाठी अडीच हजार रुपये एकर, रोटावेटरसाठी दोन हजार रुपये एकर, कांकरणी सोळाशे रुपये एकर, पट्टा काढण्यासाठी बाराशे रुपये एकर असे बाजारभाव असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी यामध्ये मोठी वाढ झाली आहे. हा भार शेतकरीवर्गावर पडला आहे. एकंदरीतच तालुक्यातील बहुतांशी सर्वच कारखान्यांनी शेतकरी सभासदांना पहिला हप्ता जमा केल्यानंतर दुसरा हप्त्याबाबत मौन बाळगले आहे. यामुळे सध्यातरी कर्ज तसेच उसनवारी करून शेतीची कामे उरकून घेण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे. विशेष म्हणजे सध्या केंद्र शासनाने सहा हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केल्याने दुसरा हप्त्याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)
आधुनिक पट्टा पद्धतीने ऊसलागवड
By admin | Updated: June 18, 2015 22:44 IST