मंचर : निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथील साडेआठ एकर क्षेत्रांतील ऊस जाळून टाकल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. उसाचे पाचट पेटवल्यानंतर आग लागून शेजारील शेतातील सर्व ऊस जळून खाक झाला. या प्रकरणी बाळू लक्ष्मण निघोट व प्रकाश नारायण निघोट (दोघे रा. निघोटवाडी) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आगीत शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री आगीची घटना घडली.संजय वामनराव बाणखेले यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली. निघोटवाडी गावच्या हद्दीत वडगाव रस्त्यालगत बाणखेले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पिक घेतले असून परिसरातील काही शेतकऱ्यांची ऊसतोडणी सुरू आहे. बाळू लक्ष्मण निघोट व प्रकाश नारायण निघोट यांनी समीर निघोट व रावसाहेब महादेव दैने यांची शेती खंडाने घेतली आहे. या शेतातील उसाचे पाचट बाळू निघोट व प्रकाश निघोट यांनी पेटवून दिले. इतर लोकांच्या पिकांचे जळून नुकसान होईल, याची जाणीव असतानाही दोघांनी पाचट पेटवून दिले. त्यामुळे शेजारील उसाला आग लागली. पाचट पेटवून देत असताना बाळू निघोट, प्रकाश निघोट यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले.संजय बाणखेले यांच्या साडेतीन एकर क्षेत्रांतील ऊस जळून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महादू विठ्ठल निघोट यांचा जमीन गट नं. ३४२ मधील दोन एकर ऊस जळाला. त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जानकीराम मारुती निघोट व पांडुरंग मारुती निघोट यांचा प्रत्येकी एक एकर ऊस जळून प्रत्येकी एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वसंत बापूराव निघोट यांचा जमीन गट नं. ३४३ व ३०७ मधील दोन एकर ऊस जळाला. त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत साडेआठ एकर क्षेत्रांतील ऊस जळून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीच्या ज्वाळा शेजारील द्राक्षाच्या बागेपर्यंत गेल्या. त्यात द्राक्षाच्या काही झाडांचे नुकसान झाले आहे.