लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘नसे केवळ हे रक्तदान, जीवनदानाचे हे पुण्य काम’, हा विचार घेऊन खराडीत प्रजासत्ताकदिनी तरुणांनी रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे आयोजित शिबिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही विक्रमी १६४४ बाटल्यांचे संकलन झाले. खराडी गावातील राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित शिबिराला जत्रेचे स्वरूप आले होते. परंतु, योग्य नियोजन आणि व्यवस्था यामुळे लोकांनी सोशल डिस्टंसिंग व अन्य नियमांचे पालन करून हे शिबिर झाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे मंगळवारी (दि. २६) हे शिबिर घेण्यात आले. सकाळपासूनच परिसरातील नागरिकांनी रक्तदानास गर्दी केली. आरोग्य तपासणी करून पात्र दात्यांना रक्तदानासाठी सोडण्यात आले. रक्तदात्यांची योग्य काळजी घेतली जात होती. त्यामुळे प्रत्येक रक्तदात्याकडून फाउंडेशनचे आभार व्यक्त होत होते. ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी, रेडप्लस रक्तपेढी व आधार रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले.
या भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजनाबद्दल माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी, प्रतिष्ठित नागरिकांनी फाउंडेशनचे व सुरेंद्र पठारे यांचे अभिनंदन केले. सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी व मित्र परिवाराने या शिबिराच्या यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम घेतले.
चौकट
“समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनची सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळेच शिबिर घेतले. रक्तदान करून प्रजासत्ताक दिनी राष्ट्राला अभिवादन करावे, अशीही भावना यामागे होती. फाउंडेशनने केलेल्या आवाहनाला तरुणांनी, नागरिकांनी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद दिल्याचा आनंद आहे. खराडीसह अन्य परिसरातूनही लोक मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी झाले. एका दिवसात एके ठिकाणी १६४४ लोकांनी रक्तदान केल्याचा विक्रम नोंदवला जाईल, याचाही आनंद आहे.”
- सुरेंद्र पठारे, अध्यक्ष, सुरेंद्र पठारे फाऊंडेशन