लोणावळा : नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर सोमप्पा पुजारी हे विजयी झाले. देशात व महाराष्ट्रात भाजपा व काँग्रेस हे कट्टर विरोधक असले, तरी लोणावळ्यात मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपाला पाठिंबा देत ‘सत्तेसाठी काय पण’ असे फक्त म्हणून नव्हे, तर करून दाखवले आहे. भाजपा व काँग्रेसच्या या देशावेगळ्या युतीमुळे केंद्र व राज्यात भाजपाचा पारंपरिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे.नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा तुंगार्ली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यामध्ये उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. निवडीनंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, ज्येष्ठ नेते रामकिशोर गुप्ता, केशवराव वाडेकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गुंड, भाजयुमोचे प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे आदींनी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर) नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या विहित कालावधीमध्ये भाजपाच्या वतीने श्रीधर पुजारी यांनी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले. शिवसेनेच्या वतीने सुनील इंगुळकर व शिवदास पिल्ले यांनी नामनिर्देशन दाखल केले होते. छाननीमध्ये सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीच्या वेळेत शिवदास पिल्ले यांनी माघार घेतल्याने पुजारी व इंगुळकर यांच्यात उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. हात उंच करून झालेल्या या मतदान प्रक्रियेत पुजारी यांना २० मते मिळाली, तर शिवसेनेच्या इंगुळकर यांना ६ मते मिळाले. पुजारी हे १४ मतांनी विजयी झाल्याचे पीठासन अधिकारी सुरेखा जाधव यांनी जाहीर केले. त्यांना सहायक म्हणून मुख्याधिकारी सचिन पवार यांनी काम पाहिले.
कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपाचा उपनगराध्यक्ष
By admin | Updated: January 12, 2017 02:45 IST