नारायणपूर : आॅक्टोबर - नोव्हेंबरमध्ये ऐन थंडीच्या दिवसांत येणारी सीताफळे बाजारात दाखल झाली आहेत. सासवडच्या फळबाजारात सीताफळाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने सीताफळाचे भाव मात्र गडगडले आहेत. पुरंदर तालुका सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब आदी फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या सीताफळाचा हंगाम आहे. यावर्षी सीताफळाचे उत्पादन वाढल्याने पुरंदरची बाजारपेठ या फळांनी भरून गेली आहे. पुरंदरला एकाच बाजारपेठ असल्याने तालुक्यातील बहुतेक शेतकरी याठिकाणी आपला माल विक्रीस आणत आहेत. जास्त उत्पादन निघाल्याने बाजारात आवक वाढल्याने सीताफळाचे बाजारभाव कमी झाले आहेत. सध्या एका कॅरेटला ४०० ते १००० रुपये बाजारभाव मिळत आहे. काही दिवसांपूर्वी याचा बाजारभाव २५०० रुपये प्रतिकॅरेट होता. याठिकाणी शेतकऱ्यांना थेट माल विकता येत असल्याने शेतकरी पुणे, मुंबई पेक्षा याच ठिकाणी माल विकणे पसंत करतात.सासवडच्या बाजारात कोकण, महाड, पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून व्यापारी माल खरेदी करत असतात. सीताफळाबरोबर आता पेरुचीही आवक होऊ लागली आहे. पेरूच्या वाणानुसार प्रति कॅरेटला भाव मिळत आहे. जास्तीतजास्त १२०० रुपये प्रतिकॅरेटला भाव मिळत आहे. प्रसिद्ध अंजीरही बाजारात दाखल होत आहे चांगल्या मालाला किमान १०० रुपये प्रतिकिलोस भाव मिळत आहे.
सीताफळाची आवक वाढल्याने भाव गडगडले
By admin | Updated: November 6, 2016 04:19 IST