लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली. महिला सबलीकरणाच्या गप्पा केवळ शहरी घराच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित न राहता त्या ग्रामीण भागापर्यंत देखील पोहोचले पाहिजेत. अनेक अत्याचाराच्या घटनांना वाचा फुटत नसल्याने त्या दबल्या जातात. त्यामुळे महिलांच्या पदरी उपेक्षाच येते. ते टाळण्यासाठी महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. ती स्वतः सुरक्षित राहिली तर समाज सुरक्षित राहील. तेव्हा ती सुरक्षित राहण्यासाठी पाऊले उचलणे हाच संकल्प असल्याचे शहरातील नामवंत महिला डॉक्टरांनी सांगितले, तसेच १०० टक्के लसीकरण झाले पाहिजे. महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपले पाहिजे, अशा भावना महिला डॉक्टरांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मांडल्या.
१. डॉ. शुभदा जोशी : महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. कोविडच्या काळात आम्ही एकही दिवस आमचे क्लिनिक बंद नाही ठेवले. आम्ही सतत रुग्णाची सेवा केली. कोविडच्या काळात समाज घाबरला होता. त्यावेळी ‘लोकमत’ने खऱ्या बातम्या देऊन आधार दिला. आता स्त्रियांंच्या सबलीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.
२. डॉ. नीता शहा : महिलांचे सबलीकरण करताना त्या आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होणे गरजेचे आहे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर काही प्रश्न आपोआप मिटतील. सर्वांनी एकाच पातळीवर येणे गरजेचे आहे. सामान्य स्त्रियांना देखील सन्मानाने जगता आले पाहिजे.
३.डॉ. वैशाली लोढा : केवळ महिलांवरच अत्याचार होतात असे नाही. गेल्या काही दिवसांत लहान मुली देखील अत्याचाराच्या बळी पडत आहेत. त्यामुळे आम्ही लहान मुलींना गुड टच, बॅड टच कसा ओळखायचा हे शिकवतो. अशावेळी काय केले पाहिजे हे त्यांना सांगितले गेले पाहिजे. आम्ही त्या प्रकारचे शिक्षण देखील देतो. मुलींना एकट्याने प्रवास करताना काय काळजी घेतली पाहिजे. हे देखील त्यांना सांगितले पाहिजे. शिवाय तिच्यात आत्मविश्वास देखील निर्माण केला पाहिजे.
४ डॉ. विद्युलता जोशी : महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. शिवाय महिलांना स्वावलंबी बनविणे गरजेचे आहे. ती बोल्ड बनावी. सर्वच क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी तिला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
५.डॉ. नीता निकम : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फुटायला हवी. त्यासाठी महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. अनके कुटुंबांतच लहान मुलीवर अथवा महिलांवर अत्याचार होतो. मात्र, कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने असे प्रकरण घराच्या चार भिंतीत दाबलं जातं. समोर न येणाऱ्या गोष्टी त्यांना देखील वाचा फुटली पाहिजे.