लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आजारी व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच बँकिग सेवा देताना इंडसइंड बँकेतील महिला रिलेशनशिप मॅनेजर व व्यवस्थापकाने खातेधारकाच्या बँक खात्यातून बनावट सहीद्वारे परस्पर पैसे काढून अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बँकेच्या मॅनेजरसह महिला अधिकाऱ्याला अटक केली आहे.
जुबेर गांधी (वय ३४) आणि अंकिता रंजन (वय ३०, रा. विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रशेखर राजगोपालन (रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. राजगोपालन यांच्या वडिलांचे इंडसइंड बँकेच्या विमाननगर शाखेत बचत खाते आहे. त्यांचे वडील ज्येष्ठ नागरिक व आजारी असल्याने त्यांच्या खात्याचा व्यवहार बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर अंकिता रंजन व व्यवस्थापक जुबेर गांधी हे घरी येऊन आवश्यक ती मदत करीत होते. राजगोपालन यांच्या वडिलांचे १० मार्चला निधन झाले. त्यानंतर चंद्रशेखर यांना त्यांच्या वडिलांच्या मोबाईलवर निपॉन इंडिया म्युच्यअल फंड या कंपनीचा एसएमएस प्राप्त झाला. त्यात २२ मार्चला केलेल्या विनंतीमध्ये खातेधारकाची सही बनावट असल्याने व्यवहार पूर्ण करता येत नाही, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे चंद्रशेखर राजगोपालन यांना संशय आल्याने त्यांनी इंडसइंड बँकेत जाऊन मेसेज बँकेतील अधिकाऱ्यांना दाखविला. वडिलांचे निधन झाले असताना अशा प्रकारचा संशयास्पद मेसेज आल्याने त्यांनी वडिलांच्या खात्याची माहिती घेतली. तेव्हा वडिलांच्या खात्यावर फक्त ४ हजार ५९६ रुपये शिल्लक असल्याने दिसून आले. त्यांनी विमानतळ पोलिसांकडे धाव घेतली.
राजगोपालन यांच्या खात्यावर असलेले फिक्स डिपॉझिट बंद करण्याकरिता त्यांच्या वडिलांच्या बनावट सह्या करून २४ मार्चला त्यांच्या खात्यातून २ लाख ३७ हजार रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या वडिलांच्या खात्याच्या केवायसीमध्ये बदल करताना मूळ मोबाईल नंबरमध्ये बदल करून बँकेत झालेल्या व्यवहाराच्या संदेशाची माहिती मिळू नये, म्हणून बँकेच्या व्यवस्थापकांनीच दुसऱ्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली. निपॉन इंडिया म्युच्युअल फंड या कंपनीमध्ये सादर करण्यात आलेला अर्ज हा राजगोपालन यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर करण्यात आला. हा सर्व प्रकार बँकेतील अधिकाऱ्यांनीच केल्याचे निष्पन्न झाल्यावर विमानतळ पोलिसांनी गांधी आणि रंजन यांना सोमवारी अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, ही अफरातफर केल्यानंतर जुबेर गांधी याची आता लष्कर शाखेत बदली झाली होती. तर अंकिता रंजन ही दुसरीकडे नोकरी करीत आहे. दोघांनाही न्यायालयाने ६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनेकांच्या फसवणुकीची शक्यता
या दोन अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे आणखी काही खातेधारकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. त्यांनी विमानतळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव पुढील तपास करीत आहेत.