पुणे : जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेच्या पुण्यातील घोले रस्ता शाखेने बेनामी खात्याद्वारे १६०७ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार केल्याचे सहकार खात्याने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून दिसून आले आहे. केंद्रीय निबंधक सहकारी संस्थेपर्यंत माहिती पोचविण्यात आल्याने उच्चस्तरावरून ही चौकशी सुरू असून, केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) पथकाने आज पुण्यात येऊन या विषयाची माहिती घेतली. आमदार रमेश थोरात आणि अन्य काही जणांनी सहकार खात्याकडे वर्षभरापूर्वी या पतसंस्थेविषयी तक्रार केली होती. बांधकाम व्यावसायिक, पोलीस अधिकारी व राजकीय नेत्यांकडील काळा पैसा प्रचलित व्यवहारात आणून पांढरा करण्याचे काम विशिष्ट वित्तीय संस्थांमधून चालते. एका बांधकाम व्यावसायिकाने गुंतविलेले कोट्यवधी रुपये परत देण्यास या पतसंस्थेने नकार दिला गेल्याचे समजते. भाईचंद हिराचंद रायसोनी ही बहुराज्यीय पतसंस्था असल्याने तत्कालीन सहकार आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यस्तरीय लेखा समितीचे सदस्य सचिव व सहनिबंधक राजेश जाधवर यांच्या नेतृत्वाखालील १० सदस्यांच्या समितीने चौकशी सुरू करून अहवाल नुकताच सादर केला आहे. संगणकावर उपलब्ध नोंद पतसंस्थेने या समितीस दिली. त्यावरून बेहिशेबी व्यवहार उघड झाले. या पतसंस्थेच्या पुण्यातील घोले रस्ता शाखेत गेल्या ७ वर्षांमध्ये १६०७ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार झाल्याचे समितीच्या तपासणीत दिसून आले आहे. घोले रस्ता शाखा क्लिअरिंग हाऊसची सदस्य नसल्याने २१ बँकांमध्ये खाती उघडून ३ हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आली.(प्रतिनिधी)
रायसोनी पतसंस्थेत बेनामी व्यवहार
By admin | Updated: May 30, 2014 04:38 IST