सासवड : संपूर्ण जून महिना संपून जुलै सुरू झाला तरी वरुणराजाने हजेरी न लावल्याने जनता भयानक दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभी आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही दिवसेंदिवस अधिक गंभीर होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर भूतलावर वरुणराजा बरसू दे, यासाठी सासवडमधील तमाम मुस्लिम बांधवांनी आज येथील ईदगाह मैदानावर पावसासाठी अल्लाला साकडे घातले. पवित्र रमजान सनाच्या पार्श्वभूमीवर आज मैदानावर नमाजपठण व पावसासाठी दुआ मागण्याचा कार्यक्रम झाला. अनवाणी पायाने चालत येऊन माथ्यावरची टोपी काढून उलटे हात धरून सर्व मुस्लिम बांधवांनी याप्रसंगी पावसासाठी अल्लाला विनवणी केली.मौलाना महंमद हनीफ नूर महंमद (कोंढवा वाल्हे) यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम झाला. मुस्तफा बागवान, कादर काझी, हाजी शकील बागवान, जावेद काझी, अँड. अशपाक बागवान, मुबारकभाई शेख, हुसेन शेख, जावेद शिकलकर, लालाभाई आतार, इमियाज आतार, हारून बागवान, अरिफ आतार यांच्यासह शहरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव या प्रार्थनेला हजर होते. सृष्टीतील मूक प्राणीमात्रांसाठी पाऊस पडावा म्हणून या प्रार्थनेत विशेष विनवणी करण्यात आली. ंरहमत कर ! बारिश कर ! .. पवित्र असणारा रमजान महिना सुरू झाला असून दिवसभर उपवास करून 'अल्ला'ची आठवण केली जात आहे. अशा या पवित्र महिन्यात रविवारी सासवडच्या ईदगाह मैदानावर रोजेदारांनी 'रहमत कर, बारिश कर ' अशी दुवा केली.
सासवडच्या मुस्लिम बांधवांचे पावसासाठी अल्लाला साकडे
By admin | Updated: July 7, 2014 05:43 IST