लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीचा अपघात झाल्याचा बनाव करून तिचे भिंतीवर डोके आपटून खून केला. त्यानंतर स्वत:चे डोके भिंतीवर आपटून अपघात झाल्याचा बनाव केला. पोलिसांच्या तपासात पतीचा बनाव उघड झाला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
संगीता राजेश सोनी (वय २२,रा. सागर बिल्डींग, गंगानगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती राजेश सोनी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी नवीन जनाला (वय २५, रा. पिंपरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राजेश पत्नी संगिताचा चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरुन त्यांच्यात नेहमी वादावादी व्हायची. १७ जानेवारी रोजी रात्री त्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटले. तिला मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत:चे डोके भिंतीवर आपटले. त्याने संगीताला रूग्णालयात दाखल केले. दुचाकी घसरून अपघात झाल्याची बतावणी त्याने केली. उपचारांपूर्वीच संगीताचा मृत्यू झाला होता.
रुग्णालयातील डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. शवविच्छेदन अहवालात संगिताला बेदम मारहाण करून तिचा खून झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी पती राजेशविरोधात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड तपास करत आहेत.