लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बारमध्ये दारू देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी हडपसर पोलिसांनी हॉटेलमालकासह ६ जणांना अटक केली आहे. सुरेश राजू रेकुंटा (वय ३०, रा. वडगावशेरी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी धनराज शंकर घुले (वय २४), सुमित सुनील घुले (वय ३८), समद अत्तार अन्सारी(वय २१), धीरज शंकर घुले (वय २१), शंकर आबा घुले (वय ५०), वैभव विष्णू रणदिवे (वय २०, सर्व रा. माळवाडी मांजरी बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत शंकर जगले (वय २९, रा. मांजरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.
सुरेश हा दारू पिण्यासाठी सोमवारी २५ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता मांजरी ब्रुद्रुक येथील हॉटेल कोलावरी-डी येथे आला होता. त्यावेळी दारू देण्याच्या कारणातून मालक धनराज घुले याच्याबरोबर त्याची वादावादी झाली. सुरेश याने देखील हॉटेलच्या शटरवर दगड फेकून मारले. त्यातूनच धनराज घुले याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून सुरेशला लाकडी बांबू व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सुरेशचा मृतदेह मांजरी रेल्वे गेटजवळ मिळून आला. येरवडा पोलीस ठाण्यात सुरेश बेपत्ता झाल्याची तक्रार २५ जानेवारीला दाखल होती. अधिक तपास केला असता, तो मृतदेह सुरेश रेकुंटा याचा असल्याचे समोर आले. दरम्यान रेकुंटा हा मुंबई येथील एका टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. तर आरोपी पैकी एक जण एका पक्षाचा स्थानिक पदाधिकारी असल्याचे समजते.