पुणे : पावसाचे जमिनीवर पडलेले भूगर्भात १५० फूट खाली पोहोचण्यासाठी सुमारे २५ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, हेच पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे योग्य नियोजन करून आपल्या बोअरवेल्सच्या माध्यमातून भूगर्भात सोडल्यास अवघ्या २५ सेकदांत ते १५० फूट खोल जाते. ही बाब लक्षात घेऊनही आपण नगरसेवक म्हणून केवळ इतरांना पाणीबचतीचे संदेश न देता, ही पाणीबचत आपल्या कृतीत उतरवून लाखो लिटर पाण्याची बचत करण्याबरोबरच इतरांनाही या पाणीबचतीसाठी सहकार्य करण्याचा आदर्श नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी घालून दिला आहे. घर आणि व्यवसायाच्या ठिकाणी यशस्वीरीत्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवून, दर वर्षी तब्बल दीड लाख लिटर पाणी भूर्गभात पोहोचवत आहेत. या प्रकल्पाची दखल अनेक सोसायट्यांनी घेतली असून, सुमारे १० ते १२ सोसायट्यांनी हे प्रकल्प सुरूही केलेले आहेत. कोथरूड येथील सहजानंद सोसायटीमध्ये सहस्रबुद्धे यांची मसाला गिरणी आहे. या ठिकाणी त्यांच्या इमारतीस सुमारे १ हजार चौरस फुटाची बाल्कनी आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत या बाल्कनीत पडणारे पावसाचे पाणी कोणताही वापर न करता तसेच वाहून जात होते. त्यामुळे हे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीची यंत्रणा त्यांनी इंटरनेटवरून शोधली. अखेर अहमदाबाद येथील एका कंपनीस संपर्क साधून त्यांनी ही यंत्रणा सुरू केली. हे पावसाचे साचणारे सर्व पाणी त्यांनी गिरणीसाठी घेतलेल्या बोअरवेलमध्ये भूगर्भात सोडले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी प्रत्येक उन्हाळ्यात सहा मिनिटेही न चालणारी त्यांची बोअरवेल गेली दोन वर्षे अविरत सुरू आहे. हीच यंत्रणा त्यांनी आपल्या एरंडवण्यातील घरातही राबविली. या ठिकाणी २४०० चौरस फुटांचे टेरेस असून, त्यावर पडणारे पावसाचे पाणीही त्यांनी बोअरवेलमध्येच सोडले आहे. या दोन्ही प्रकल्पांतून दर वर्षी सव्वादोन लाख लिटर पाणी भूगर्भात सोडले जात असल्याचे सहस्रबुद्धे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(प्रतिनिधी)
थेंबाथेंबांतून साठवले दीड लाख लिटर पाणी
By admin | Updated: July 15, 2014 03:52 IST