पिंपरी : पालिकेच्या सद्य:स्थिती अहवालात पवना नदी प्रदूषित करणाऱ्या १२९ नाल्यांची माहिती लपवून ठेवण्यात आली असून, खोटी माहिती शासनास दिल्याबद्दल पालिकेच्या पर्यावरण (अभि) कक्ष प्रमुखाच्या कामकाजाची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी पुणे जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य विकास पाटील यांनी केली आहे. शहरातून पवना नदी वाहते. रावेत धरणातून तिचा विसर्ग होतो. महापालिकेच्या पर्यावरण (अभि) कक्षाच्या ताब्यात असलेल्या रावेत मलशुद्धीकरण प्रकल्पाच्या गलथान कार्यपद्धतीमुळे नदी दूषित होत आहे. त्यामुळे पर्यावरण (अभि) कक्षाच्या संपूर्ण कामकाजाची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी केली.पालिकेचे महापौर, आयुक्त, सभापती, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, शहर अभियंता (प्रभारी), सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता (पाणी शुद्धीकरण), अतिरिक्त आयुक्त आदींना दिलेल्या निवेदनात याबाबत नमूद करण्यात आले आहे. सदर अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, १२९ नाल्यांची नावे व स्थळांची माहिती द्यावी. तसेच भोसरी ते पुनावळे या परिसरातील किती सांडपाणी पवना नदीत जाते, याचे खरे मोजमाप करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पालिकेच्या अहवालातून १२९ नाले गायब
By admin | Updated: June 25, 2016 00:33 IST