वाकड : महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंधरा दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या नवीन मतदार नावनोंदणी मोहिमेचा शेवटचा दिवस असल्याने थेरगाव करसंकलन कार्यालयात सकाळपासूनच मोठी झुंबड उडाली. मात्र, वेळेअभावी अर्ज न स्वीकारल्याने सुमारे दहा हजार नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी २०५ चिंचवड विधानसभा कार्यालय थेरगाव येथे सकाळी ९ वाजल्यापासूनच नागरिकांनी अर्ज घेऊन गर्दी करण्यास सुरुवात केली. पाहता-पाहता गर्दी आवाक्याच्या बाहेर गेली. दुपारी चारपर्यंत सुमारे हजारो नागरिक येथे रांगेत उभे होते. अर्ज देण्यासाठी एकच झुंबड उडाली. सर्वत्र गोंधळ सुरू असल्याने अखेर सुरक्षारक्षक व वाकड पोलिसांना पाचारण करण्यात आले. महिन्याभरापासून सुरू असलेल्या ह्या नावनोंदणीचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक जण काहीही करून अर्ज देण्यासाठी कसरत करत होता. मात्र, उसळलेली गर्दी अन् हजारोंची गर्दी पाहता अनेकांनी बीएलएकडे अर्ज देऊन घरी जाणे पसंत केले. मात्र, अनेकांचे अर्ज अद्यापही त्यांच्याकडील गठ्ठ्यात पडून आहेत. सुरुवातीला कागदपत्रांची छाननी करून अर्ज स्वीकृत केले जात होते. मात्र, दुपारनंतर वाढलेली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांची अतिरिक्त पाच काउंटर लावण्यात आली. तरीही गर्दी कमी होत नसल्याने केवळ अर्जाचा स्वीकार करून पोहोच पावती देण्यात आली नाही. पाच वाजता इमारतीचे गेट बंद करून जेवढे अर्जदार आत होते, तेवढ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतरदेखील बंद गेटच्या बाहेर शेकडो नागरिक ताटकळत उभे होते. सायंकाळी सहापर्यंत प्रत्यक्षात सुमारे २५ हजार अर्ज दाखल झाल्याची माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.(वार्ताहर)
मतदारनोंदणीसाठी झुंबड
By admin | Updated: October 15, 2016 03:10 IST