उरळी कांचन : जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये घातक हत्यारांसह दरोडे टाकणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील चारजणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी २ तोळे सोन्यासह ४ मोबाईल हस्तगत केले आहेत. भाऊ उर्फ भावड्या बेळ्या काळे (वय २३), राजु उर्फ लंगड्या सुल्या पवार (वय २०), अनिल सुल्या पवार (वय २३), अविनाश उर्फ लल्ल्या उर्फ आकाश बेळ्या पवार (वय २०, सर्व रा. जवळा, ता. जामखेड, जि. नगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार वंट्या उर्फ संतोष दिलीप काळे, सचिन दिलीप काळे (रा. जामखेड, जि. नगर) हे पसार होण्यात यशस्वी झाले. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालीत असताना सोलापूर- पुणे महामार्गावर थेऊन फाटा येथे एका मंदिराच्या भिंतीजवळ ७ ते ८ जण संशयास्पद अवस्थेत आढळून आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांच्या दिशेने जात असताना आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करुन नागरिकांच्या मदतीने चारजणांना पकडले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता एका बॅगेत कोयता, ३ मोबाईल, दोन कटावणी, सुरा, सायकलचे स्टँड, स्क्रु ड्रायव्हर मिळून आला. आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरुन तपासासाठी जवळा येथे गेलेल्या पोलिसांनी फरारी आरोपी बाबुशा टकाऱ्या काळे (वय ३२) यालाही अटक केली. या टोळीविरुद्ध जामखेड, करमाळा, कर्जत पोलीस ठाण्यांमध्ये दरोडे, जबरी चोरी, घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, पोलीस कर्मचारी दत्तात्रय गिरमकर, गणेश पोटे स्वप्नील अहिवळे, दशरथ बनसोडे, रणजीत निकम, बाळासाहेब चोरामले यांच्या पथकाने केली.
दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By admin | Updated: August 14, 2014 04:26 IST