पुणे : दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आलेल्या पुण्यामध्ये गेल्या चार वर्षांत तीन बॉम्बस्फोट घडवूनही, शहरातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला मात्र ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे. १५ आॅगस्टपूर्वी परिमंडल एकच्या हद्दीमध्ये १३२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या आश्वासनालाही ठेकेदाराने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. बुधवारपर्यंत परिमंडल एकच्या हद्दीमध्ये एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम सुरू झालेले नव्हते. ठेकेदाराच्या कुर्मगतीने चाललेल्या कामापुढे पोलीस, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हतबल झाल्या आहेत. १३ फेब्रुवारी २०१० रोजी जर्मन बेकरीमध्ये इंडीयन मुजाहिद्दीनने पहिला बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यापूर्वी कोंढव्यातील अशोका म्युज या इमारतीमधून इंडीयन मुजाहिद्दीनचे काम चालत होते. १ आॅगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रस्त्यावर पाच बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आपल्या ‘हिटलिस्ट’वर पुणे असल्याचे दाखवून दिले होते. जंगली महाराज रस्त्यावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर, शहरामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी दबाव येऊ लागल्यावर, राज्य शासनाने सीसीटीव्हींची निविदा काढली. अलाईट डिजिटल कंपनीला तब्बल २२४ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. पुण्यातील रस्त्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्याची आणि त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची मुदत १५ आॅगस्ट २०१४ ही होती. परंतु, जंगली महाराज रस्ता, डेक्कन आणि काही मोजक्याच ठिकाणांवर केवळ खांब उभे करण्यापलीकडे हे काम सरकू शकलेले नाही. सीसीटीव्ही बसविण्याचे काम ४२ आठवड्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा सप्टेंबर २०१३ मध्ये करण्यात आली होती. मे २०१३ मध्ये अलाईड कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. आपली कंपनी आर्थिक अडचणींमध्ये असून, पुरेसा निधी नसल्याचे या कंपनीने त्या वेळी सांगितले होते. परंतु, एका कंपनीच्या अडचणीसाठी पुणेकरांच्या सुरक्षेशी खेळ का केला जात आहे, हाच खरा प्रश्न आहे. २० आॅगस्टला ओंकारेश्वर पुलावर झालेली डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या आणि १० जुलै रोजी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारातील बॉम्बस्फोटानंतर मात्र पुन्हा एकदा सीसीटीव्ही बसविण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी तातडीने दोन्ही महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांची ठेकेदारासह बैठक घेऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. १५ आॅगस्टपर्यंत शहरातील संपूर्ण काम करण्यास असमर्थता दर्शवित या ठेकेदाराने या मुदतीत परिमंडल एकच्या हद्दीतील काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ही मुदत तोंडावर आलेली असूनही अद्याप एकाही सीसीटीव्हीचे काम झालेले नसल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुर रहमान यांनी सांगितले. सीसीटीव्ही समन्वय समितीने ठेकेदारासोबत आजवर १० ते १५ बैठकी घेतल्या आहेत. फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट झाल्यानंतर, या कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीमध्ये दिल्यानंतर, जाग्या झालेल्या कंपनीने तोंडदेखले काम सुरूकेले होते. परंतु, कंपनीचे संथगतीने चालणारे काम पाहून फरासखाना पोलीस ठाण्याचा आवारात चार सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनीच बसवून घेतले. तसेच, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टने बेलबाग चौक, बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी आणि गणपती बसण्याचे ठिकाण या परिसरात ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. या कंपनीने आतापर्यंत केवळ ७३ खांब उभे केले आहेत. एवढ्या कालावधीमध्ये केवळ ५० कॅमेऱ्यांची आॅर्डर या कंपनीने दिलेली आहे. १० आॅगस्टपर्यंत ११० ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित सुरू होतील असे सांगण्यात येत होते; परंतु अद्याप एकही कॅमेरा सुरू झालेला नाही. (प्रतिनिधी)
सीसीटीव्हीसाठी ‘तारीख पे तारीख’
By admin | Updated: August 14, 2014 04:21 IST