पिंपरी : पिंंपरी-चिंचवड शहर वेगात विस्तारत आहे. उद्योग, आयटी, शैैक्षणिक, वैद्यकीय, बांधकाम, अभियांत्रिकी, क्रीडा, बॅँका, इलेक्ट्रॉनिक्स अशा सर्वच क्षेत्रांत युवकांचा सहभाग मोठा आहे. स्मार्टसोबत यंग सिटीचे रूप शहरास येत आहे. शहराच्या विकासात युवकवर्गाची महत्त्वपूर्ण भागीदार उठून दिसत आहे.शहरात सर्वत्र निवासी बांधकामे जोरात सुरू आहेत. उंचच-उंच टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या क्षेत्रात युवकांची संख्या अधिक दिसते. अधिकारी, अभियंता, तसेच कामगार असे ५० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणवर्ग या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक कुटुंब शहरात स्थायिक होत असून, त्यामुळे नवी पिढी शहरात राहण्यास पसंती देत आहे. परिणामी, तरुणाईची संख्या वाढत आहे. नोकरी आणि व्यवसायानिमित्त शहराला प्राधान्य दिले जात आहे. औद्योगिकनगरी म्हणून शहराची ओळख आहे. भोसरी एमआयडीसीबरोबरच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लहान-मोठे उद्योग आहेत. अनेक बहुराष्ट्रीय उद्योग उत्पादन करीत आहेत. अधिकारी, अभियंत्यापासून कामगार असा युवामंडळीचा या क्षेत्रात सर्वाधिक भरणा असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. नवे उद्योजक पुढे येत असल्याने सकारात्मक चित्र आहे. परराज्यातून शहरात येऊन तरुण उद्योजक आणि कामगार येथे स्थिरावले आहेत. शहरालगतच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये सेवेत असलेले हजारो तरुण अभियंते कार्यरत आहेत. बहुतेक अभियंते शहरात राहत आहेत. यामुळे शहरामध्ये युवा अभियंत्यांची संख्या वाढतच आहे. आंतरराष्ट्रीय व देशपातळीवरील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या अनेक शाखा शहरात आहेत. हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यादानाचे काम करणारे शिक्षक व प्राध्यापक मंडळींची नवी पिढी अद्ययावत पद्धतीने ज्ञानदानाचे काम करीत आहे. इंटरनेट आणि स्मार्ट मोबाइलच्या जमान्यात ज्ञानदानाचे काम तरुणाईने काबीज केले आहे. संशोधनातही हा वर्ग पुढे येत आहे. अनेक प्रसिद्ध रुग्णालये येथे असल्याने या माध्यमातून सेवा आणि रोजगार निर्माण झाला आहे. या वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांमध्ये युवावर्गास अधिक संधी मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स, बॅँका आदींसह इतर क्षेत्रांतही तरुणांची भागीदारी उठून दिसत आहे. त्याचबरोबर क्रीडा विभाग युवकांच्या बळावरच यशस्वी कामगिरी करीत आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू शहरात निर्माण होत आहेत. महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये असंख्य चेहरे हे ३५च्या आतील आहेत. सर्वच क्षेत्रांत युवावर्गाचा सहभाग लक्षणीय आहे. शहर स्मार्ट सिटीसोबत यंग सिटीचे रूप घेत आहे. शहर नव्या रूपात दिसत आहे. नव्या रूपातील या शहरात तरुणाईची ताकत मोठी आहे. युवाशक्तीची ताकत योग्य ठिकाणी आणि योग्य मार्गावर लावल्यास शहराचा विकास परिपूर्ण होण्यास मदत होईल. हे पाऊल स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त ठरेल. (प्रतिनिधी)राष्ट्रीय युवा पुरस्कार पिंपरीच्या प्रवीण निकमला भारत सरकारच्या केंद्रीय क्रीडा व युवक मंत्रालयातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय युवा पुरस्कार एचए कॉलनी, पिंपरी येथील प्रवीण निकम याला जाहीर झाला आहे. छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात त्याला सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रकुल युवा निवडणूकीत प्रवीण विजयी झाला. यापूर्वी हा पुरस्कार अमित गोरखे यांना मिळाला आहे.
सर्वच क्षेत्रांत युवकांची सक्रिय भागीदारी
By admin | Updated: January 12, 2016 03:59 IST