निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांना डिवचणारी सहर शेख कोण? भाषणाचे व्हिडीओ होत आहेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:42 IST2026-01-21T15:20:49+5:302026-01-21T15:42:59+5:30
ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग ३० मध्ये AIMIM ला मोठे यश मिळाले. या परिसरात या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्चस्व होते, या वर्चस्वाला आता सुरुंग लावण्यात आला आहे. मुंब्रा परिसरात एआयएमआयएमचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर आले. ठाणे महानगरपालिकेत शिंदेसेनेने मोठे यश मिळवले. या निकालामध्ये मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३० ने राज्याचे लक्ष वेधून घेतले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा झटका बसला आहे. मुंब्रा प्रभागातील चारही उमेदवारांचा पराभव झाला आहे.

या प्रभागातून AIMIM कडून सहर शेख यांनी निवडणूक लढवली. त्यांनी दणदणीत विजय मिळवत राजकारणात प्रवेश केला. दोन दिवसापूर्वी त्यांनी विजयी सभा घेतली. या सभेत त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड डिवचले. त्यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले. सध्या हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ठाणे महानगरपालिकेतील भाग क्रमांक ३० मध्ये AIMIM ला यश मिळाले. या प्रभागातून AIMIM चे नफिस अन्सारी, सहर युनुस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरिक या चार उमेदवारांचा विजय झाला. या निकालाममुळे मुंब्रामधील राजकीय समिकरणे बदलल्याचे चित्र आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या निकालानंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी विजयी सभा घेतली. या सभेमध्ये सहर शेख यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. शेख यांची ही पहिलीच निवडणूक आहे, पहिल्याच निवडणुकीत त्यांनी मोठं यश मिळवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

आपल्या भाषणात सहर शेख म्हणाल्या, 'आपण त्या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या. काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे. आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही,” असा टोलाही आव्हाड यांना शेख यांनी लगावला. “पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठे प्रत्युत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असे विधानही त्यांनी केले.

सहर शेख यांच्या कुटुंबियांची राजकीय पार्श्वभूमी आहे.त. त्यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते. ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे होते. युनूस शेख यांनी सहर शेख यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. पण, आव्हाड यांनी देतो म्हणून सांगून नंतर त्यांनी शब्द फिरवल्याचा दावा सहर शेख यांनी केला.

दरम्यान, सहर शेख यांच्या भाषणतील 'पूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकू', या विधानावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सहर शेख यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. “हिरवा हा आमच्या पक्षाचा रंग आहे. रंग कोणत्याही धर्माशी जोडलेले नाहीत. संविधान कुठेही हिरवा मुस्लिमांचा आणि भगवा हिंदूंचा रंग आहे असं सांगत नाही. माझं वक्तव्य धर्मांध नव्हतं. माझा विचार धर्मनिरपेक्षतेचा आहे, असे स्पष्टीकरण सहर शेख यांनी दिले.

















