जिल्ह्यातील बहुतांश रुग्णांवर सध्या त्यांच्या घरीच उपचार सुरू आहेत. घरी राहणाऱ्या या रुग्णांचे मास्क, तसेच त्यांनी वापरलेल्या इतर टाकावू वस्तूंच्या कचऱ्याचे विलगीकरण करून संकलन करण्याची स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, त्या संदर्भाने फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे या रुग्णांच्या माध्यमातून पुन्हा कोरोना पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
परभणी शहरासारख्या ठिकाणी तरी महापालिकेच्या घंटागाडीच्या माध्यमातून या कचऱ्याचे संकलन केले जाते. मात्र, ग्रामीण भागात हाच कचरा सर्रास कोठेही टाकला जातो. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करीत असताना, कोरोनाबाधित रुग्णांपासून तयार होणाऱ्या कचऱ्याचीही योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे झाले आहे. बाधित रुग्णांचे मास्क, सॅनिटायझर, इतर वस्तूंचा कचरा स्वतंत्ररीत्या बायो मेडिकल वेस्ट म्हणून संकलित करण्याची गरज आहे. तेव्हा या संदर्भाने प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
कचऱ्यातून कोरोना पसरू शकतो का?
कचऱ्याचे योग्य पद्धतीने संकलन झाले नाही, तर कचऱ्यापासूनही कोरोना पसरू शकतो, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कचऱ्याचे संकलन करताना, योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोनाबाधित रुग्णांनी वापरलेले कपडे, मास्क आणि इतर कचरा हा बायोमेडिकल वेस्ट असून, या कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीनेच संकलन करणे आवश्यक आहे.
परभणीत बायोमेडिकल वेस्ट संकलित करणारी एजन्सी आहे. मात्र, केवळ दवाखान्यातील कचराच ही एजन्सी संकलित करते. त्यामुळे रुग़्णांनीच या संदर्भात पुढाकार घेऊन या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्टेवाट लावण्याची गरज आहे.