दैठणा : यावर्षी पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. परंतु, रबी हंगामासाठी दैठणा कालव्यामध्ये यंदाच्या रबी हंगामासाठी दोन वेळा पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे. परंतु, रबी हंगाम सुरू होवून अद्यापही जायकवाडीचे पाणी सोडले नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
दीड-दोन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे कापूस व तूर पाण्याअभावी वाळून जात आहे. अशावेळी जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यास शेतकर्यांना तूर व कापूस यासह रबी हंगाम घेणे सोयीस्कर होईल.
परंतु, वेळ निघून गेल्यानंतर प्रशासनाच्या वतीने जायकवाडी कालव्यातून परभणी तालुक्यामध्ये पाणी सोडल्यास या पाण्याचा उपयोग शेतकर्यांना होणार नाही.
त्यामुळे पाटबंधारे विभागाने तात्काळ सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे. परंतु, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकर्यांमधून आश्चर्यव्यक्त होत आहे. (वार्ताहर)
> जायकवाडी कालव्यातील अनेक वर्षांपासून गाळ काढला नाही. संबंधित कार्यालयाकडून थातूरमातून गाळ काढून संबंधित ठेकेदारांनी लाखोंची कमाई केली. परंतु, गाळ न काढल्यामुळे आज घडीला जायकवाडी कालवा गाळाने पूर्णभरला आहे. पाणी सोडल्यानंतर कालव्यातून पाणी वाहन्यास अडथळा निर्माण होवू शकतो. परंतु, याचे देणेघेणेच पाटबंधारे विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. उपअभियंता नावालाच
> दैठणा व ब्रह्मपुरी येथील जायकवाडी कॅम्पमध्ये कार्यरत असलेले उपअभियंता राठोड हे मुख्यालयी न राहता नांदेड येथूनच भ्रमणध्वनीवरूनच कारभार चालवित आहेत. शेतकरी कालव्यामध्ये कधी पाणी सोडणार हे विचारण्यासाठी कार्यालयामध्ये खेटे मारत आहेत. परंतु, अभियंता जागेवर नसल्याने शेतकर्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.