परभणी : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १ हजार ७०१ अंगणवाड्यांपैकी तब्बल १ हजार ६५३ अंगणवाड्यांमध्ये स्वत:ची पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांमधील मुलांना पाण्यासाठी इतर ठिकाणे गाठावी लागतात.
प्रत्येक अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे असताना जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नसल्याचे बाब समोर आली होती. त्यामुळे या अंगणवाड्या कुठे ग्रामपंचायत कार्यालयात तर कुठे खासगी जागेत भरविल्या जात होत्या. आता जिल्ह्यातील एकूण १ हजार ७०१ अंगणवाड्यांपैकी १ हजार ६५३ अंगणवाड्यांमध्ये स्वत:ची पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या फक्त ४८ अंगणवाड्यांमध्येच स्वत:च्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात ३६५ अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीचे पाणी घेऊन तहान भागवावी लागते. तर १ हजार ३७ अंगणवाड्यातील मुलांना परिसरातील हातपंपाचा आधार आहे. ८९ अंगणवाड्यांना सार्वजनिक विहिरीवरून पाणी उपलब्ध होते. १७१ अंगणवाड्यांना खासगी नळ जोडणीतील पाणी घ्यावे लागते. त्यामुळे या अंगणवाड्यांना आता स्वत:च्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत या अंगणवाड्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासकीय पातळीवर कामकाजाला सुरुवात झाली आहे.
एकूण अंगणवाड्या
१,७०१
नळ जोडण्या नसलेल्या अंगणवाड्या
१,६५३
तालुका अंगणवाड्या नळ जोडण्या नसलेल्या अंगणवाड्या
गंगाखेड २१९ २१२
पाथरी १४२ १३१
परभणी २९३ २८२
जिंतूर ३१६ ३१६
पालम १७० १६७
पूर्णा १९३ १९३
सेलू १५५ १५०
मानवत १०० ९२
सोनपेठ ११३ ११२