पालम : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विजेचा पुरवठा करण्यासाठी ३0 वर्षापूर्वी वीज तारा ओढण्यात आल्या आहेत. या जुन्या तारावरच विजेचा भार असल्याने तांत्रिक बिघाड होऊन ११ गावांतील वीजपुरवठा खंडीत होत आहे.
पलाम तालुक्यात ४ उपकेंद्रातून ग्रामीण भागामध्ये घरगुती ग्राहक व कृषी पंपांना वीजपुरवठा केला जातो. नवीन उपकेंद्र निर्माण न केल्याने वीजपुरवठय़ात दिवसेंदिवस अडसर निर्माण होत आहे. केरवाडी, सिरपूर, सायळा, गणेशवाडी, आरखेड, फळा, घोडा, सोमेश्वर, आडगाव, कापसी, वनभूजवाडी या गावांना वीजपुरवठा करणार्या मुख्य लाईनच्या तारा अतिशय जुनाट झाल्या आहेत. तसेच विद्युत खांबावरील व रोहित्राचे साहित्य जनुे झाल्याने विजेमध्ये नेहमीच तांत्रिक बिघाड होत आहेत. तारा जुन्या झाल्याने तुटत आहेत.
यामुळे या भागातील ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे. या तारांना ३0 ते ३५ वर्ष झाल्याने तारा कमकुवत बनल्या आहेत. तारा लोंबकळल्याने एकमेकांना स्पर्श होऊन वीजपुरवठा बंद होत आहे. याबाबत अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे या गावातील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. परंतु, याकडे वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचार्यांना लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून येत आहे.
यामुळे या गावातील नागरिकांना अंधारात दिवस काढण्याची वेळ आली आहे. वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने दळण आणण्यासाठी नागरिकांना बाहेरगावी जावे लागत आहे. याचे मात्र वीज वितरणच्या कर्मचार्यांना काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.
पालम तालुक्यामधील कृषी पंपासाठी विद्युत पोल ओढण्यात आले आहेत. यामध्ये बाहुतांश पोल वाकलेल्या अवस्थेत उभे आहेत. तसेच हाताला तारा लागत आहेत. यामुळे शेतकर्यांना शेतामध्ये पेरणी अथवा ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे अवघड झाले आहे. हीे दुरुस्त करण्यासाठी शेतकर्यांनी वीज वितरण कंपनीकडे तोंडी व लेखी वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पावसाळ्यामध्ये पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यानंतर मुक्या जनावरांना जीव गमवावा लागला आहे. याचे सोयरसूतक वीज वितरण कंपनीला नसल्याचे दिसत आहे. /(प्रतिनिधी)
■ विजेचा पुरवठा नेहमीच खंडीत होत असल्याने अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास बिघाड झाला की दुरुस्त करणे कठीण होत आहे. यामुळे रात्र अंधारात काढण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे.
> केरवाडी परिसरातील विजेच्या तारा व साहित्य बदल करण्याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. तारा नवीन टाकाव्यात व स्वतंत्र फिडर बसवावे, अशी या भागातील ग्रामस्थांची मागणी आहे. रोहित्र नादुरुस्त होण्याचेही प्रकार
> ग्रामीण भागात विजेचे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे देखील वीज पुरवठय़ात व्यत्यय निर्माण होतो. विशेष म्हणजे दहा-दहा दिवस हे रोहीत्र दुरुस्त होत नाहीत. रोहित्र बदलण्यासाठी ग्रामस्थांना अनेक वेळा पाठपुरावा करावा लागतो. वीज वितरण कंपनीने ग्रामीण भागातील वीज समस्या गांभीर्याने सोडविणे गरजेचे आहे.