गंगाखेड : येथील गोदावरी नदीपात्रात सर्वत्र केरकचरा, प्लास्टिक व नालीचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. या संदर्भात स्वच्छता अभियान व जनजागृतीबाबत राबविण्यात आलेली मोहीम कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
गंगाखेड शहरातून वाहणाऱ्या व दक्षिण गंगा महणून ओळख असलेल्या गोदावरी नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून जुने फाटके कपडे, प्लास्टिकच्या पिशव्या, पोते टाकण्यात येत आहेत. तसेच नाल्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी पात्रात सोडण्यात आल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय नदी प्रदूषित झाली आहे. दशक्रिया विधी करण्यासाठी पुरातन काळापासून येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या नागरिकांना या घाणीच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे धार्मिक विधी पार पाडण्यासाठी येथे येणारे काही नागरिक मृत व्यक्तीचे कपडे, राख आणलेले पोते, चव्हाळे व अन्य साहित्य नदीपात्रातच फेकत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. पात्रात वाहते पाणी नसल्याने दिवसेंदिवस या परिसरात दुर्गंधी वाढत आहे. त्यामुळे नदीत अंघोळ करण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
सांडपाण्याचे नियोजन करण्याची गरज
शहरातील नागरी वस्तीतील नाल्यांद्वारे येणारे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. या सांडपाण्याचे नगरपालिकेने नियोजन करणे आवश्यक आहे; परंतु पालिकेकडून अशा कुठल्याही हालचाली सुरू नाहीत. या संदर्भात जनजागृती करण्यात येत असल्याचे पालिकेडून सांगण्यात येत असले तरी ही जनजागृती कागदावरच सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे. त्यामुळे कागदोपत्री होणारा खर्च टाळून नदीच्या स्वच्छतेची मोहीम पालिकेने राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.